नवी मुंबई : आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच तिमाहीत ४३४.०२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा करून नवी मुंबई महापालिकेने महसूल संकलनाचा नवा विक्रम नोंदविला आहे. विशेष म्हणजे, यंदा करदात्यांसाठी कोणतीही सवलत, अभय योजना किंवा व्याजमाफी लागू करण्यात आली नव्हती. तरीही १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक तिमाही वसुलीची नोंद झाली असून, मागील आर्थिक वर्षातील ८७६ कोटी रुपयांच्या एकूण वसुलीपैकी जवळपास ५० टक्के महसूल अवघ्या तीन महिन्यांत जमा झाला आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एवढ्या प्रमाणात मालमत्ता कर संकलित करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. यंदा शहरातील ३ लाख ५५ हजार ७७२ करदात्यांपैकी १ लाख ४३ हजार ३२९ करदात्यांनी मालमत्ता कर भरला. गेल्या वर्षी याच कालावधीत ९८ हजार ४७८ करदात्यांकडून ३७२.४२ कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे करदात्यांच्या संख्येबरोबरच महसूल संकलनातही लक्षणीय वाढ झाली.
तंत्रज्ञानाचा वापर आणि डेटा विश्लेषणावर आधारित नियोजन या वसुलीत महत्त्वाचे ठरल्याचा दावा महापालिकेने केला आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या अधिपत्याखाली मालमत्ता कर विभागाने थकीत कर, करदात्यांच्या भरणा पद्धती, विभागनिहाय वसुली आणि महसूल संकलनातील संधींचे विश्लेषण करून रिअल-टाइम डॅशबोर्ड व व्यवस्थापन अहवालांच्या माध्यमातून वसुली प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवली.
त्यातून मागील वर्षी किंवा त्यापूर्वी कर न भरलेल्या १५ हजार २५० मालमत्ताधारकांकडून २३.६७ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच, मागील वर्षी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत कर भरणाऱ्या १ लाख २३ हजार ३२३ करदात्यांपैकी ५६ हजार ९७३ करदात्यांनी यंदा पहिल्याच तिमाहीत १६५.७४ कोटी रुपयांहून अधिक कर भरल्याने वेळेत कर भरण्याचे प्रमाण वाढल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.
ऑनलाइन व्यवहारांत वाढ एकूण कर संकलनापैकी १ लाख ३ हजार ४७३ करदात्यांनी २८०.७१ कोटी रुपये (७२.२ टक्के) ऑनलाइन भरले. २७ हजार २३ करदात्यांनी ८.३६ कोटी रुपये ऑफलाइन, तर १२ हजार ८३३ करदात्यांकडून १४४.९३ कोटी रुपये बँक व्यवहारांद्वारे जमा झाले. एसएमएस आणि व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आलेल्या पर्सनलाइज्ड पेमेंट लिंकच्या माध्यमातून ५७ हजार ३९७ करदात्यांनी सुमारे ५८ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला.
सोशल मीडियावरील माहितीपर पोस्ट, मार्गदर्शक व्हिडिओ, रील्स तसेच शहरातील प्रमुख चौक, वाहतूक सिग्नल आणि घंटागाड्यांवरील ऑडिओ जिंगल्सद्वारेही करभरणीबाबत जनजागृती करण्यात आली. विभागनिहाय वसुलीत घणसोली विभागातून सर्वाधिक ८० कोटी रुपयांचा कर जमा झाला. मालमत्तेच्या प्रकारानुसार औद्योगिक मालमत्तांचा महसुलातील वाटा ३५.७९ टक्के, निवासी ३१.९२ टक्के, व्यावसायिक २२.२६ टक्के, तर मिश्र व इतर मालमत्तांचा १०.०३ टक्के आहे.
नवी मुंबईकरांनी जबाबदारीने करभरणा केल्यामुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्याच तिमाहीत ४३४.०२ कोटी इतक्या रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा विक्रम नोंदवला गेला आहे. ही केवळ महसूल वृद्धी नसून नागरिकांचा महानगरपालिकेवरील विश्वास, डिजिटल सुविधांचा वाढता स्वीकार आणि शहराच्या विकासात योगदान देण्याची सामूहिक भावना यांचे प्रतीक आहे.
-सुजाता पाटील, महापौर, नवी मुंबई महानगरपालिका
मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या विकासकामांचा प्रमुख आधारस्तंभ आहे. यंदा पहिल्याच तिमाहीत ४३४.०२ कोटी रुपयांच्या विक्रमी कर संकलनाची नोंद होणे ही प्रशासन, कर्मचारी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांची फलश्रुती आहे. आगामी काळातही अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख सेवा देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
