नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवरील विविध गटांतील रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पदभरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. उमेदवारांना आता १ मार्च २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार असून, त्याच वेळेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेही बंधनकारक राहणार आहे. निर्धारित वेळेनंतर भरलेले शुल्क वैध मानले जाणार नाही, तसेच शुल्काचा परतावाही केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेकडून १४ डिसेंबर २०२५ रोजी नियमित आस्थापनेवरील सरळसेवेच्या रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अंतर्गत गट-अ मधील १५ संवर्ग, गट-ब मधील ३ संवर्ग आणि गट-क मधील २ संवर्ग अशा एकूण २० संवर्गांतील पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती आस्था/०२/२०२५, आस्था/०३/२०२५ आणि आस्था/०४/२०२५ या जाहिरात क्रमांकांद्वारे जाहीर करण्यात आली होती. सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सुरुवातीला अर्ज सादर करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक कालावधी मिळावा आणि अधिकाधिक इच्छुकांना संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, १४ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीतील तसेच १९ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पात्रता निकष, वयोमर्यादा, आरक्षण, परीक्षा पद्धती, शुल्क संरचना आणि इतर सर्व बाबी पूर्ववत राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेच्या पदभरतीकडे अनेक तरुणांचे लक्ष लागले असून, विविध तांत्रिक व प्रशासकीय संवर्गांतील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुदतवाढीमुळे उशिरा तयारी पूर्ण करणाऱ्या तसेच तांत्रिक कारणांमुळे अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.