नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०२५च्या सरळसेवा पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेला ३० संवर्गांतील ६६८ पदांच्या भरतीची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याची मुभा मिळाली आहे. या भरती परीक्षेचे स्कोअर कार्ड ११ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र, सध्या करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांची पदे वगळून उपलब्ध रिक्त पदांवरच नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या नियमित आस्थापनेवरील गट-क आणि गट-डमधील पदे सरळसेवेने भरण्यासाठी २७ मार्च २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील पदसंख्या वाढल्याने २९ एप्रिल २०२५ रोजी शुद्धीपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार ३० संवर्गांतील ६६८ पदांसाठी एकूण ८४ हजार ७७४ अर्ज प्राप्त झाले होते.
या उमेदवारांसाठी टीसीएस आयओएनच्या माध्यमातून १६ ते १९ जुलै २०२५दरम्यान २८ परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ६८ हजार १४९ उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. मात्र, महापालिकेत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांनी या पदभरतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे २५ ऑगस्ट २०२५ रोजी न्यायालयाने परीक्षेचे गुणपत्रक जाहीर न करण्याचे निर्देश दिले होते.
या प्रकरणी १९ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाने अंतरिम अर्ज निकाली काढताना महापालिकेला भरती प्रक्रिया पुढे नेण्याची परवानगी दिली. त्याचवेळी करार पद्धतीने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या करारातील सेवेला धक्का देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच करार कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
महापालिकेत सध्या ४७७ कर्मचारी करार पद्धतीने कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची पदे वगळून उर्वरित उपलब्ध पदांवरच नव्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर उर्वरित पदांबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, या भरतीतील ३० संवर्गांचे स्कोअर कार्ड ११ सप्टेंबर २०२६ रोजी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचा संवर्गनिहाय तपशीलही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उपलब्ध पदांच्या मर्यादेतच नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
