नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झालेल्या अर्जदारांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांना अपूर्ण कागदपत्रे सादर करण्यासाठी ४ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
महापालिकेने शिष्यवृत्ती योजनेसाठी लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याची प्रथम मुदत २० जून २०२५ ते ३१ जुलै २०२५ अशी जाहीर केली होती. तसेच १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर प्रतिसाद लक्षात घेऊन नोंदणी व अर्ज सादरीकरणासाठी अनुक्रमे दुसरी आणि तिसरी मुदतवाढ देण्यात आली. नोंदणीसाठी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत, तर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती.
दरम्यान, प्राप्त अर्जांची तपासणी करताना अनेक लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याचे निदर्शनास आले. अशा अर्जदारांचे अर्ज ‘सेंड बॅक’ करून संबंधितांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ४ मार्च २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. याबाबतची माहिती अर्जदारांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे.
निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एसएमएसची नोंद घेऊन तत्काळ ऑनलाईन प्रणालीवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
