नवी मुंबई : सीवूड्स येथे महापालिकेने १० कोटी रुपये खर्च करून बांधलेली शाळा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आहे. नव्या सीबीएसई शाळेच्या कामाची मुदत ३१ जानेवारी २०२४ पर्यंत होती. मात्र अजूनही हे काम सुरूच असल्याने येत्या शैक्षणिक वर्षात तरी नव्या इमारतीत प्रत्यक्ष शाळा सुरू होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

नवी मुंबई महापालिकेने ४ ऑगस्ट २०१८ रोजी सीवूड्स येथील पहिली सीबीएसई शाळा क्रमांक ९३ येथे सुरू केली तर कोपरखैरणे सेक्टर ११ येथे शाळा क्रमांक ९४ ही दुसरी सीबीएसई शाळा महापालिकेच्यावतीने सुरू आहे. या दोन्ही शाळांना सीबीएसई शाळांची मान्यता ऑगस्ट २०२५ मध्ये मिळाली आहे.

विद्यार्थ्यांचा सीबीएसई शाळांकडे वाढता कल असून पालिकेने शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करत शिक्षण रूपांतर धोरण मंजूर करत इंग्रजीची कास धरण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात इंग्रजी तसेच सीबीएसई शाळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालिकेने बेलापूर विभागातील नेरूळ येथील भूखंड क्रमांक १३ सेक्टर ५० येथे जवळजवळ १० कोटी खर्चाची नवीन शाळा इमारत तयार केली आहे.

या इमारतीच्या कामाची मुदत १० जून २०२२ पर्यंत देण्यात आली होती.परंतु अद्याप या इमारतीचे काम सुरू असून नव्या शैक्षणिक वर्षात तरी ही इमारत वापरात येणार का असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. ठेकेदाराकडून या इमारतीचे काम सुरू असून नवी मुंबईतील सीबीएसई शाळांना मागणी वाढत असून येत्या शैक्षणिक वर्षात तरी नव्या इमारतीचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाला विरोध

  • नवी मुंबई महापालिकेत शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे शिक्षण रूपांतर धोरण २०२६ महासभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली असून मराठी शाळा बंद न करता दोन्ही माध्यमांची शैक्षणिक व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी होत आहे.
  • मराठी शाळा टिकवण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना विविध राजकीय तसेच भाजपच्या आमदारांनीही विरोध दर्शवला आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमधून अधिक चांगल्या प्रतीचे शिक्षण दिल्यास त्या बंद करण्याची वेळ येणार नाही.
  • इंग्रजी माध्यमाचा विस्तार करताना आवश्यक प्रशिक्षित शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपलब्धता हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या महापालिकेच्या सीबीएसई शाळांमध्येही शिक्षकांची कमतरता जाणवत असून, काही शाळा मनुष्यबळाअभावी अडचणीत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

कोट नवी मुंबईतील शाळांचे सरसकट इंग्रजीकरण म्हणजे शिक्षण व्यवस्थेचे खासगीकरण आहे. त्याला सातत्याने आमचा विरोध राहणार आहे. पालिकेने शहरातील इंग्रजी, सीबीएसई शाळांमध्ये मराठीला दुय्यम दर्जा देऊ नये. -गजानन काळे, मनसे.

कोट

शहरात इंग्रजी व सीबीएसई शाळांची मागणी वाढत असली तरी मराठी ही टिकलीच पाहिजे. सीबीएसई शाळेला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मराठीचे महत्त्व कमी होता कामा नये. पालिकेने सीवूड्स येथील शाळेसाठी बांधलेली नवी इमारत यंदा वापरात आलीच पाहिजे. -विशाल विचारे, नगरसेवक.

कोट

सीवूड्स येथील नव्या सीबीएसई शाळेचे बहुतांश काम पूर्ण करण्यात आले आहे. शाळेच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिल २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. -मदन वाघचौडे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका, बेलापूर विभाग.