नव मुंबई : गेल्या वर्षी मार्चपासून सुरू झालेल्या करोना साथीचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ३०० कोटी रुपये खर्च केल्याची शक्यता आहे. या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आहे, पण ती पालिकेच्या वतीने देण्यात आलेली नाही. ही साथ अद्याप संपलेली नसल्याने त्यावरील एकूण खर्चाची गोळा बेरीज करण्यात आलेली नाही, पण ती लवकरच केली जाईल असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही साथ आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून आरोग्य यंत्रणा उभारली असून यातील काही यंत्रणाही करोना साथीनंतरही नवी मुंबईकरांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी कामी येणार आहेत.

नवी मुंबई करोनाचा पहिला रुग्ण आठ मार्च रोजी आढळून आला. फिलिपाइन्स वरून आलेल्या एका धर्मगुरूच्या माध्यमातून या आजाराचा प्रसार नवी मुंबईत झाल्याचे मानले जाते. या धर्मगुरूचा मृत्यू मुंबईतील शासकीय रुग्णालयात झाला. तेव्हापासून पालिकेने साथ रोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून करोनाचा मुकाबला करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेचा सामना करताना पालिकेने ४६ कोटी रुपये खर्चाची आरोग्य यंत्रणा उभारल्याचे जाहीर केले होते, मात्र पुढील लाटेच्या तयारीसाठी पालिकेने आतापर्यंत २५० कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचे दिसून येते. १६ करोना काळजी केंद्राबरोबरच प्राणवायू साठा व प्राणवायू रुग्णशय्यांची वेगळी व्यवस्था करावी लागली आहे. पहिल्यांदा सर्वसाधारण रुग्णांवरील उपचारासाठी भाडय़ाने घेण्यात आलेल्या डी. वाय पाटील रुग्णालयातील दोनशे रुग्णशय्यांनंतर कोविडच्या अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या आहेत. या रुग्णालयाला पालिकेने भाडय़ापोटी काही कोटी रुपये दिलेले आहेत.

ऐरोली व नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालये आता तिसऱ्या लाटेसाठी तयार करण्यात आली असून यात अत्यवस्थ रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष उभारण्यात आलेले आहे. याशिवाय पनवेल येथील इंडिया बुल्समधील एक हजार रुग्णशय्यांची तयारी, रुग्णवाहिका, रुग्णाचे भोजन, वैद्यकीय साहित्य आणि औषधे, प्राणवायू प्रकल्प आदी वैद्यकीय कामांसाठी खर्च झालेला आहे.

वैद्यकीय खर्चाचे लेखापरीक्षण?

रुग्णशय्यांचे दर दुप्पट  लावण्यात आलेले आहेत तर हातमोजेही निकृष्ट दर्जाचे पुरविण्यात आल्याचे उघडकीस झालेले आहे. काही वैद्यकीय उपकरणात मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेलपेक्षा वेगळे दर आकारण्यात आले आहेत. या सर्व खर्चाचे वेगळे वैद्यकीय लेखापरीक्षण होण्याची शक्यता आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation spends rs 300 crore on corona treatment facilities zws
First published on: 09-10-2021 at 00:56 IST