नवी मुंबई पालिका मुख्यालयाला रोषणाई, विविध कार्यक्रमांचे आयोजन

नवी मुंबई महानगरपालिकेचा २५वा वर्धापन दिन १ जानेवारी २०१७ ला साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान महानगरपालिका मुख्यालयात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता नववर्षांरंभ दिनानिमित्त व महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त नेत्रदीपक आतषबाजी केली जाईल. १ जानेवारीला सकाळी १० ते ४  दरम्यान विष्णुदास भावे नाटय़गृह, वाशी येथे महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रौप्यमहोत्सवाचा विशेष कार्यक्रम सकाळी ११ वाजता महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार संदीप नाईक, विधान परिषद सदस्य नरेंद्र पाटील, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि महापालिका पदाधिकारी, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नवी मुंबईकरांसाठी भारतीय लोकसंस्कृतीचा गीत नृत्यमय संगीत सोहळा ‘कलाधिष्ठित महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमाचे सायंकाळी ७  वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही. नवी मुंबईकरांनी याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहून रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ जानेवारी १९९२ रोजी ग्रामपंचायतीमधून थेट महानगरपालिकेत रूपांतर झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील स्वत:च्या मालकीचे धरण असणारी पहिली जलसंपन्न महानगरपालिका, देशातील सर्वोत्तम जमीनभरणा पद्धतीवर आधारित शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी शुद्ध करणारी पर्यावरणपूरक सी-टेक मलप्रक्रिया केंद्रे, १९५हून अधिक उद्यानांची गार्डन सिटी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्हिजन, एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारे ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र, त्रीस्तरीय आरोग्य सेवा, एनएमएमटीची बससेवा, महिला-बालके-मागसवर्गीय-ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० हून अधिक कल्याणकारी योजना राबविणारी अग्रगण्य महानगरपालिका, वास्तुरचनेचा उत्तम नमुना ठरणारे गोल्ड मानांकित मुख्यालय व त्यापुढील देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजस्तंभ, ई-गव्हर्नन्सव्दारे २१ प्रकारच्या नागरी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारी व वेबसाइटसह मोबाइल अ‍ॅपवर करभरणा सुविधा देणारी अग्रगण्य महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे.