नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वात वर्दळीचा मार्ग असणाऱ्या वाशी-कोपरखैरणे मार्गावर गुलाबचंद डेअरी परिसरात नवा पादचारी पूल उभारणीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोपरखैरणे येथील डी-मार्ट चौक ते तीन टाकीपर्यत असलेल्या मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने सातत्याने कोंडी होते. आता अनेक वर्षानंतर या स्कायवॉकचा प्रस्ताव मार्गी लागल्याने या कोंडीमुक्तीची आशा आहे. मात्र यापूर्वी बाजारपेठांनी गजबजलेल्या वाशी सेक्टर ९-१० च्या मध्यावर उभारलेल्या स्कायवॉकचा फारसा वापर होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे हा नवा पूल या मार्गावरील कोंडीचा उतारा ठरेल का, असा सवालही उपस्थित होत आहे.

वाशी कोपरखैरणे मार्गावरील कोपरखैरणे सेक्टर १५ येथे उभारण्यात येणार असलेल्या या पुलासाठी एकूण ६ कोटी ५९ लाख ३ हजार १९२ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सरकता जिना आणि उद्वाहनाची सोय असणार आहे. सुमारे दोन दशकांपासून या ठिकाणी स्कायवॉकची मागणी होत होती.

नवी मुंबई शहरांतर्गत सर्वाधिक रहदारीचा मार्ग म्हणून वाशी कोपरखैरणे ओळखला जातो. या मार्गावर वाशी सेक्टर ९-१०, १५-१६ , जुहू गाव, रा. फ. नाईक चौक आणि कोपरखैरणे सेक्टर १५ चा नाका (गुलाबसन्स डेअरी ) या ठिकाणी रोज सकाळी साडे नऊ ते दुपारी एक ते दीड आणि संध्याकाळी पाच साडेपाच ते रात्री साडे दहापर्यंत हमखास वाहतूक कोंडी होते.

जुहू गावव्यतिरिक्त सर्व ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी ही केवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांमुळे होत असते. त्यात वाशी सेक्टर ९-१० च्या मध्यावर बाजारपेठेजवळ स्कायवॉकचे निर्माण केल्यानंतर वाहतूक कोंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र त्यापेक्षा कित्येक पटीने कोपरखैरणे सेक्टर १५ च्या नाक्यावर वाहतूक कोंडी होत असूनही त्याकडे प्रशासन फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी दोन वेळा ज्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण केले होते, त्यात या स्कायवॉकच्या मागणीचा अंतर्भाव होता.

या ठिकाणी दाट लोकवस्ती असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारे सेक्टर ५ ते ८ आणि दुसऱ्या बाजूला १५ ते १८ हा भाग आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालय, बस थांबे आणि बाजार आहे. त्यामुळे कायम वर्दळ असते. त्यात रेल्वे स्थानकापासून सेक्टर १५ ते १८ मध्ये राहणारे रहिवासी चालत येत असल्याने संध्याकाळच्या वेळी लोकलच्या वेळेनुसार नागरिकांचा लोंढा रस्ता ओलांडण्यासाठी येत असतो. पूर्वी या दोन्ही रस्त्यांमधून गाड्यांना ये-जा करण्यासाठी दुभाजकात जागा (कट) होती. मात्र वाहतूक पोलिसांनी अनेक विनंती अर्ज केल्यावर ही जागा गाड्यांसाठी बंद करण्यात आली.

येथील रहदारीमुळे अपघात नित्याचे झाले आहेत. चार वर्षांपूर्वी या चौकातील एका वर्तमान पत्र विक्रेत्याचा अपघातात जीव गेला होता. शहरातील सर्वाधिक अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या याच ठिकाणी आढळून येते. आता या प्रस्तावित स्कायवॉकमुळे या कोंडीवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र पादचाऱ्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर न केल्यास आधीच्या स्कायवॉकसारखा हाही वापराविना राहण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

महापालिका सुमारे साडे सहा कोटी खर्च करून कोपरखैरणे सेक्टर १५ च्या नाक्यावर स्कायवॉकचे निर्माण करणार आहे. त्यासाठी ६ कोटी ५९ लाख ३ हजार १९२ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याची निविदा प्रक्रिया लवकरच होणार आहे. सरकता जिना असल्याने आजारी व्यक्ती, जेष्ठ नागरिकांना, गर्भवती महिलांना या स्कायवॉकचा सहज वापर करता येणार आहे. शिरीष आरदवाड, शहर अभियंता

स्कायवॉकची वैशिष्ट्ये

-उंची ५. मीटर, रुंदी ३. ५ मीटर आणि लांबी सुमारे १२ मीटर.

– एका दिशेला उद्वाहन आणि दुसऱ्या दिशेला सरकता जिना. – एकूण अंदाजित खर्च ६ कोटी ५९ लाख ३ हजार १९२ रुपये