पालिका निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने घेण्याच्या हालचाली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : यापूर्वीच्या महाविकास आघाडीने जाहीर केल्याप्रमाणे बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रशासकीय पातळीवर सर्व प्रक्रिया झाली आहे. आता ९ जुलै रोजी मतदार यादीही अंतिम होणार आहे. मात्र राज्यात सत्ताबदलामुळे बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होणारी की पूर्वीप्रमाणे याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. राज्य निवडणूक आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत हाचचाली सुरू असल्याला दुजोरा दिला आहे.

नवी मुंबईत गेली दोन वर्षे पालिका निवडणूक झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार व तत्कालीन राज्य सरकारने बदललेल्या नियामानुसार नवी मुंबई पालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मतदारांच्या हरकती व सूचना स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर नऊ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. सर्वाच्च न्यायालयाने कमी व अतिवृष्टीच्या ठिकाणी विभागून निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग कामाला लागले असून मतदार यादी जाहीर केल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम सुरू असतानाच राज्यात सत्ताबदल झाला असून भाजपाच्या पांठिब्यावर शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने सरकार स्थापन केले आहे.

महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील पालिका व नगरपालिकांसाठी बहुसदस्यीय (पॅनल) पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणूक प्रक्रियेचा फायदा महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन घटक पक्षांना होण्याची दाट शक्यता होती. एका बहुसदस्यीय प्रभागात हे तीन पक्ष एकत्र लढल्यास त्याचा त्यांना फायदा होण्याची खात्री होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सूचनेवरून हा निर्णय जाहीर करण्यात आला होता पण आता राज्यातील सरकार बदलल्याने त्यांच्या सोयीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नवी मुंबई पालिकेत एकूण १११ प्रभाग होते त्यात वाढ करून ते आता १२२ झाले असून त्यांच्यासाठी बहुसदस्यीय पद्धतीने ४१ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.

मतदार याद्यांवर १८४२ हरकती

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिध्द करण्यात आल्या असून त्याबाबत हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत एकूण १८४२ हरकती घेण्यात आल्या आहेत. हरकतींनुसार  मतदार यादीत बदल होणार का यासाठी सर्वाचे लक्ष  लागून असून ९ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर ,आरक्षण सोडत आणि आता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादाही प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. यावर  १८४२ हरकती घेतल्या गेल्या आहेत. त्यावर नियमानुसार सुनावणी घेतली जात नाही. मात्र हरकतीनुसार स्थळपाहणी पालिकेमार्फत करण्यात येते व त्यानुसार दुरुस्ती करुन अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला जातो. त्यामुळे किती हरकतींनुसार बदल होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पालिका निवडणुकीत ८,४५,५२४ एकूण मतदार निश्चित करण्यात आले असून प्रभागनिहाय ४१ प्रभागांच्या मतदारयाद्या काही दिवसांपूर्वी प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.

विभागनिहाय हरकती

बेलापूर- ३१५

नेरुळ- १२९

तुर्भे-५७

वाशी- १२५

कोपरखैरणे- १४८

घणसोली- ३७२

ऐरोली- ५६६

दिघा- १२७

मुख्यालय स्तरावर हरकत- ३

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation voter list will be finalized 9 july zws
First published on: 05-07-2022 at 00:13 IST