Premium

नवी मुंबई : मोरबे धरणातून पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत

महिन्याला ३० हजार लिटर पाणी वापरावर जेमतेम ५० रुपयांचे पाणी बिलाचे सूत्र गेली १५ वर्षे शहरात राबविले जात आहे. त्यामुळे सिडको वसाहतींमध्ये पाणीवापरावर बंधनच राहिलेले नाही.

navi mumbai water supply, navi mumbai municipal corporation no control on water distribution, water intake from morbe dam
नवी मुंबई : मोरबे धरणातून पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत (संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिसरातील उपनगरांमध्ये पाण्याचा सुरू असलेला अनिर्बंध वापर आणि कामोठे, खारघर यांसारख्या पनवेल महापालिका हद्दीतील उपनगरांना पुरवावे लागणारे पाणी यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोरबे धरणातील पाण्याचा उपसा क्षमतेपेक्षाही वाढला आहे. गुरुवारी दिवसभरात महापालिकेने मोरबे धरणातून ५२६ दशलक्ष लिटर इतका पाण्याचा उपसा केला. विशेष म्हणजे, मोरबे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ४९० दशलक्ष लिटर इतके पिण्यायोग्य पाणी महापालिका परिसरात पुरविण्यात आले. एरवीपेक्षा हे प्रमाण बरेच अधिक असल्याने शहरातील पाणीपुरवठा नियोजनाविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई शहराची २०३५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेत महापालिकेने मोरबे धरण विकत घेतले होते. या धरणाची पाण्याची क्षमता ४५० दशलक्ष लिटर इतकी आहे. असे असले तरी गेल्या काही काळापासून महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या उपनगरांमधील पाण्याचा वापर अनिर्बंध पद्धतीने सुरू आहे. महिन्याला ३० हजार लिटर पाणी वापरावर जेमतेम ५० रुपयांचे पाणी बिलाचे सूत्र गेली १५ वर्षे शहरात राबविले जात आहे. त्यामुळे सिडको वसाहतींमध्ये पाणीवापरावर बंधनच राहिलेले नाही.

हेही वाचा : नवी मुंबई : कोंबिंग ऑपरेशनमध्ये ८४ लाख ८५ हजारांचा अंमली पदार्थ साठा जप्त, नायझेरियन नागरिकाला अटक

सीबीडी, नेरुळ यांसारख्या उपनगरांमध्ये प्रतिमाणशी प्रतिदिन पाण्याचा वापर २१० लिटरपेक्षाही अधिक झाला आहे. तर शहराच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या ऐरोली, दिघा यांसारख्या उपनगरांमध्ये हे प्रमाण १५० लिटरपेक्षाही कमी आहे. पाणी वितरण व्यवस्थेच्या नियोजनाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित होत असताना गेल्या काही दिवसांपासून महापालिका मोरबे धरणातून ५०० दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाण्याचा उपसा करू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा : “मानव जात एक आहे मग माणसा माणसात भेद का?” माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे प्रतिपादन

वाढीव उपशाचा यंत्रणेवर ताण

धरणातील पाणी उपशाच्या प्रतिदिन क्षमतेपेक्षा महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अधिक पाण्याचा उपसा करत आहे. गुरुवारी हे प्रमाण ५२५ दशलक्ष लिटरपेक्षाही अधिक होते. या धरणातून ४५० एमएलडी पाणी उपशासाठी मोठ्या क्षमतेचे सहा पंप तैनात करण्यात आले आहेत. असे असताना गेल्या काही काळापासून सातवा अतिरिक्त पंप लावून पाण्याचा उपसा केला जात आहे. यामुळे वितरण व्यवस्थेत दोष निर्माण होऊ शकतात. शिवाय जलवाहिनी फुटीचे प्रकारही घडू शकतात अशी माहिती या विभागातील सूत्रांनी दिली. मोरबे धरणातून प्रक्रिया न केलेले पाणी भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथील क्षमताही ४५० दशलक्ष लिटर इतकी आहे, असे असताना तेथेही ४७५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. अतिरिक्त पाणी उपशामुळे जलवाहिन्या फुटण्याचा धोका आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : पनवेलमध्ये ३६ तास पाणी पुरवठा बंद, पिण्यासाठी की साठवणूकीसाठी पाणी भरावे सिडको वसाहतीमधील महिलांना प्रश्न

पाण्याचा वापर वाढला

मोरबे धरणाच्या क्षमतेनुसार शहरातील पाण्याचा वापर व्हावा असे गणित असताना गेल्या काही काळापासून शहरातील पाण्याचा वापरही वाढला आहे. या वाढीव पाणीवापरावर मात्र महापालिकेचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे सध्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात ४८० ते ४९० दशलक्ष लिटर इतका पाण्याचा पुरवठा केला जात असून हे प्रमाण एरवीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी अधिक आहे, अशी माहिती अभियंता विभागातील सूत्रांनी दिली. “नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून अतिरिक्त पाणी उपसा केला जात आहे. यासंबंधी नियंत्रण ठेवावे यासाठी शहर अभियंता विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत”, असे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : उरण – खारकोपर लोकलचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते? पुन्हा चर्चा रंगली

“नवी मुंबईच्या मोरबे धरणाची पाणी उपसा क्षमता ४५० एमएलडी आहे. सध्या एमआयडीसीकडून पालिकेला २० एमएलडी पाणी कमी मिळत आहे. त्यामुळे धरणातून क्षमतेपेक्षा अधिक पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच पाणीपुरवठा पाइपलाइन यांच्यावर दाब येऊन मोरबे पाइपलाइन फुटणे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पात तांत्रिक अडचणी निर्माण होण्याचा धोका आहे”, असे नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी म्हटले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai municipal corporation water planning disturbed due to no control on water intake from morbe dam and its distribution to the city css

First published on: 07-10-2023 at 14:11 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा