नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून या बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी, वायू प्रदूषण तसेच ब्लास्टिंगबाबत वाढत्या तक्रारींचे योग्य ते निराकारण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. महापालिकेने याबाबत प्रमाणित संचालन नियमावली अर्थात एसओपी जाहीर केली असून बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणाही अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

बांधकामांच्या ठिकाणी निश्चित नियमावली करण्यासाठी समिती निश्चित केली होती. या समितीचे नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे प्रमुख आहेत. नवी मुंबई महापालिकेचे शिरीष आरदवाड यांच्याकडे शहर अभियंता व अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार असल्याने तेच या समितीचे प्रमुख आहेत.

हेही वाचा…नवी मुंबईत वीस लाखांचे हेरॉईन जप्त; तिघांना अटक, एका महिलेचा समावेश

शहरात पुनर्विकासाची कामे तसेच नव्याने बांधकाम होऊ घातलेल्या बहुमजली इमारतींची कामे वाशी व सीवूड्स, नेरुळ विभागांत मोठ्या प्रमाणात सुरू असून बांधकाम प्रकल्पांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वेळीअवेळी होत असलेल्या या मोठ्या यंत्रांच्या आवाजामुळे ध्वनी व वायू प्रदूषण होत असून पालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी शहरातील बांधकाम नियमावलींबाबत तसेच तक्रार निवारणाबाबत एक समिती निश्चित करून त्याची एसओपी नियमावली तयार केली आहे.

समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त २ हे समितीचे प्रमुख असून त्याच्यासमवेत अतिरिक्त शहर अभियंता हे या समितीचे सदस्य सचिव तसेच विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त, नवी मुंबई महापालिकेचे सहाय्यक संचालक नगररचना, सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ मायनिंग व तेल रिसर्चचे मुख्य शास्त्रज्ञ, पेट्रोलियम व एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी आणि संरचना अभियांत्रिकी विभाग वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्युट, माटुंगा मुंबईचे प्रमुख डॉ. केशव सांगळे समितीत असून त्यांच्याद्वारे नियमावली जाहीर केली आहे.

हेही वाचा…कळंबोलीत पुन्हा जलमापकांची चोरी

शहरात सिडकोकालिन इमारतींच्या पुनर्विकासाला वेगाने सुरुवात झाली

असून त्याची व्यापकता पुढील काही वर्षांत वाढणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सूर्योदयानंतर बांधकामांना सुरुवात करून सूर्यास्तापर्यंत ही बांधकामे करणे योग्य असले तरी शहरात मोठ्या प्रमाणात अवेळी कामे सुरू असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत मोठमोठ्या यंत्रांची धडधड व ठकठकचा आवाज डोक्यावर घण घालत असल्याचे भासते.

शहरातील इमारतींमध्ये वाहनतळ हे बंधनकारक केल्यामुळे २ ते ३ मजल्यापर्यंत खाली खोदकाम केले जात आहे. त्यात सीवू्डस, नेरुळ, वाशी, कोपरखैरणेसह विविध बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकामांमुळे व सततच्या ब्लास्टिंगमुळे शेजारच्या सिडको वसाहतीमधील हजारो कुटुंबीय जीव मुठीत घेऊन जीवन जगत असल्याचे चित्र असून पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही फक्त पालिका अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे बिनकामाचे ठरले होते. त्यामुळे आमचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या विभागातील संतप्त नागरिक विचारू लागले होते.

हेही वाचा…नवी मुंबई : ४७ शाळा सीसीटीव्हीविना, सखी सावित्री तसेच विशाखा समितीबाबतही शाळांचे दुर्लक्ष

प्रमाणित संचालन प्रक्रिया अर्थात एसोपी निश्चित केली असून त्यावर आता अंमलबजावणी कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नियमावलीतील महत्त्वाच्या गोष्टी…

-भूखंडावर १० मी उंच जाळी लावणे

-रस्त्यावरील धूळ प्रदूषणाबाबत दंडात्मक कारवाई

-बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने ताडपत्रीने झाकणे

-कामगारांनाही मुखपट्टी देणे

-धूळ रोखण्यासाठी वेट जेटचा वापर करावा

-खोदकाम तसेच बांधकामाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६

-आरएमसी प्लान्ट करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी अनिवार्य

-बांधकामांच्या ठिकाणी ध्वनीपातळी तपासणी हवी

-वाहनांना जीपीएस प्रणाली हवी

-एका पाहणीवेळी प्रति चौरस मीटरप्रमाणे दंड आकरणी होणार

हेही वाचा…उरण : जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा, भात पिकांवरील रोगाचा प्रतिबंध होण्यास मदत

बांधकाम नियमावली अर्थात एसओपी जाहीर करण्यात आली असून याबाबत शहरातील सर्व विकासकांची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचित करण्यात येईल. नियमावलींचे पालन होते का यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बांधकाम व्यावसायिकांना अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे पालिकेला कडक नियंत्रण ठेवता येणार आहे. – डॉ. कैलास शिंदे , आयुक्त नवी मुंबई महापालिका