नवी मुंबई : नवी मुंबईकरांना यंदाच्या वर्षी प्रथमच वर्षभराची कर आकारणी करणाऱ्या महापालिका प्रशासनाने सुरुवातीच्या तीन महिन्यांत हा कर भरणा करण्यात दिरंगाई करणाऱ्यांना १ जुलैपासून दंड आकारणी सुरू केली. यापूर्वी महापालिकेमार्फत सहा महिन्यांनी कराची आकारणी केली जात होती. यावेळी मात्र वर्षभराची कर आकारणी एकत्रितपणे केली गेली आहे. त्यामुळे पहिल्या तिमाहीत ज्या मालमत्ताधारकांनी कर भरणा केलेला नाही त्यांना हा दंड आकारला जाणार आहे.
यापुढे दरवर्षी एक जुलैपासून विलंब दंड (शास्ती) लागू केली जाणार आहे. आगामी काळात थकबाकीदारांना मालमत्ताकर भरण्याच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ज्यांनी पहिल्या तिमाहीमध्ये कराचा भरणा केला नाही अशा थकबाकीदारांवर एक जुलैपासून प्रतिमहिना दोन टक्के विलंब दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने यंदा प्रथमच आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच ३६६ कोटी रुपयांचे विक्रमी कर संकलन केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी पत्रकारांना दिली. महापालिकेच्या इतिहासातील हा विक्रम असल्याचा दावाही त्यांनी केला.
नव्या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने यंदा १२०० कोटी रुपयांचे महत्वकांक्षी उद्दीष्ट ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी महानगरपालिकेने चालू वर्षात बचतगटांच्या महिलांद्वारे बिलांचे घरपोच वाटप, मोबाईल ॲप्लिकेशनच्या साहाय्याने मालमत्ताधारकांच्या माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण (KYC), मालमत्ताकर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचा स्वीकार, मालमत्ताकर बिल व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि मालमत्ताकर बिलातील सामान्य करावरील १० % सवलत योजनेचा लाभ असे अभिनव उपक्रम यंदा राबविण्यास सुरुवात केली आहे.
पहिल्या तिमाहीतील विक्रम
महापालिकेकडे नोंदविल्या गेलेल्या तीन लाख ४७ हजार ७८८ करदात्यांपैकी एक लाख ५८७ इतक्या करदात्यांकडून ३६६ कोटी ६० लाख रुपयांचा हा कर भरणा झाला आहे. यापैकी ६३ हजार ४८८ करदात्यांनी ॲानलाइन पद्धतीने २२० कोटी रुपयांचा कर भरला आहे, अशी माहिती डाॅ.शिंदे यांनी दिली. तिमाहीच्या शेवटच्या दिवशी तब्बल ९० कोटी ८४ लाखांचे कर संकलन झाले आहे. करसंकलनामध्ये घरपोच बिलांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
नेरुळमधून सर्वाधिक कर भरणा
महापालिकेच्या नेरुळ विभागातून सर्वाधिक ७४.१३ कोटी रुपयांचा कर भरणा झाला आहे. निवासी मालमत्ता – ३३ टक्के, औद्योगिक मालमत्ता – ३३ टक्के, व्यावयासिक मालमत्ता -२३ टक्के आणि इतर मालमत्तांमधून ११ टक्के कराची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे.
शहराच्या विकासामध्ये प्रत्येक करदात्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याने भरलेल्या करातूनच शहराचा विकास होतो. शहराच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा वेळेवर भरलेला कर हा विश्वासाचा भाग आहे. पहिल्या तिमाहीत झालेल्या विक्रमी करसंकलनातून नवी मुंबईकरांनी दाखवलेली जबाबदारी निश्चितच उल्लेखनीय आहे. मात्र आता नियमानुसार 1 जुलैपासून विलंब दंड लागू होत आहे. त्यामुळे अनावश्यक दंड टाळण्यासाठी नागरिकांनी तात्काळ कर भरून विकासाच्या वाटचालीत भागीदार व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.