नवी मुंबई : नेरूळ एल.पी. नाका उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्यातून जात असताना दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याच्या गंभीर प्रकरणात नवी मुंबई महापालिकेने पहिली मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. महापालिका परिमंडळ-१ येथील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना गुरुवारी तात्काळ निलंबित करण्यात आले. संबंधित ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने हा अपघात घडल्याचे नमूद करत, कार्यालयप्रमुख म्हणून कामावर नियंत्रणाचा अभाव आणि कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
बुधवारी मुसळधार पावसादरम्यान नेरूळ एल.पी. नाका उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातून जात असताना शुभांगी वालखंडे (१७) आणि उज्वला वाघ (१९) या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दोघींना तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले. दोघींची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
या घटनेनंतर जबाबदारीवरून महापालिका आणि महावितरण यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. महावितरणने संबंधित ठिकाणी त्यांच्या वीज वितरण यंत्रणेत कोणताही दोष नसल्याचा दावा करत, विजेचा प्रवाह महापालिकेच्या पथदिवा यंत्रणेतून झाल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, महापालिकेने नेमका कोणत्या विद्युत तारेच्या संपर्कात पाणी आल्यामुळे विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसला, याची चौकशी सुरू केली होती.
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्यामुळे हा अपघात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच कार्यालयप्रमुख म्हणून कामावर नियंत्रणाचा अभाव असल्याने आणि कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने प्रवीण गाडे यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, पुढील आदेशापर्यंत त्यांचे मुख्यालय सार्वजनिक बांधकाम विभागात राहणार आहे.
या घटनेमुळे पावसाळ्यात सार्वजनिक ठिकाणांवरील विद्युत सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी विद्युत यंत्रणा आणि पथदिव्यांची नियमित तपासणी, देखभाल आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा झाला का, याचाही तपास सुरू आहे. नेरूळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तांत्रिक अहवालानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
मनसेची गुन्हा दाखल करण्याची मागणी
नेरूळ एल.पी. नाका उड्डाणपुलाखाली दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याच्या घटनेनंतर मनसेने संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भात मनसेने गुरुवारी नवी मुंबई शहरप्रमुख गजानन काळे यांच्या नेतृत्वात आयुक्तांच्या दालनात अर्धनग्न होत ठिय्या आंदोलन केले. या घटनेस जबाबदार असलेल्या महापालिकेच्या विद्युत विभागातील संबंधित अभियंत्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही नेरुळचे सहाय्यक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ यांच्याकडे करण्यात आली होती. कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्या निलंबनानंतर या कारवाईचे स्वागत करत, हा निर्णय आपल्या पाठपुराव्याचा परिणाम असल्याचा दावा मनसेने केला आहे.
