मागील काही दिवसांपासून मुंबई, उपनगरांबरोबरच ठाणे, नवी मुंबई, पनवेल भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसाचा फटका इतिहासाचा साक्षीदार असलेल्या बेलापूर किल्ल्याच्या बुरूजाला बसला. किल्ल्याचं संवर्धन करण्याचं काम सध्या सिडकोकडून सुरू असून, त्यातच आता किल्ल्याचा टेहाळणी बुरूज अचानक ढासळला. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

सलग सुरू असलेल्या पावसामुळे बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. जोरदार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेसमोरील किल्ल्याचा बुरुज अचानक जमीनदोस्त झाला. ही घटना घडली त्यावेळी परिसरात कुणी नव्हतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा किल्ला थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगिजांकडून मिळवला होता. आज ढासळलेल्या बुरुजावरुन शत्रूवर नजर ठेवण्याचं काम केलं जायचं.

संबंधित वृत्त – बेलापूर किल्ल्याला ऐतिहासिक झळाली

असा आहे किल्लाचा इतिहास…

बेलापूर किल्ल्याबद्दलच्या नोंदी १५६०पासून असून, १७३७ मध्ये चिमाची अप्पांच्या नेतृत्वात हा किल्ला पोतृगीजांनी जिंकला. तर १८१७ मध्ये इंग्रजांनी हा ताब्यात घेतला होता. इंग्रजांच्या काळात बेलापूर किल्ल्यावर १८० सैनिकांच्या ४ तुकड्या व १४ तोफा असल्याचा उल्लेख आढळतो. याच किल्ल्याचे सिडकोच्या माध्यमातून संवर्धन व सुशोभीकरण करण्यात येत आहे.

संबंधित वृत्त – बेलापूर किल्ल्यावर १७ कोटींचा खर्च

किल्ल्याचे क्षेत्र-५ एकर, संवर्धनाचा खर्च – १८ कोटी

किल्ल्याच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यापूर्वी काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली आहेत. पर्यटनस्थळ व सांस्कृतिक, शैक्षणिक उफक्रमाचे केंद्र बनेल अशा दृष्टीने किल्ल्याचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे. किल्ल्याचे बांधकाम करताना तत्कालिन बांधकाम सामुग्री व शैलीचा वापर होणार, किल्ल्यावर जाण्यासाठी पायरी मार्ग, रॅम्प, बॅटरीचलित वाहनांची सुविधा, वस्तुसंग्रहालय ,खुला रंगमंच, प्रदर्शन केंद्र, तिकीटघर, टेहळणी बुरुज, अम्फी थिएटर, उपहारगृह, वाहनतळ, उद्यान व कारंजे आदीसंदर्भात किमया आर्किटेक्ट या ऐतिहासिक वास्तू संवर्धन क्षेत्रातील अनुभव असलेल्या कंपनीला आराखडा बनवण्याचे काम दिलेलं आहे.

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, डॉ. संजय मुखर्जी यांनी बेलापूर किल्ल्याचा टेहळणी बुरुज कोसळल्याच्या घटनेची दखल घेतली असून, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी, मुख्य अभियंता व अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटना स्थळाची पाहणी केली. सिडको व्यवस्थापनातर्फे या घटनेची लवकरात लवकर चौकशी करण्यात येणार असल्याचं सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं.