नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेवर लोकप्रतिनिधींची सत्ता स्थापन होऊन सहा महिने उलटले, तरी नगरसेवकांनी आपल्या प्रभागांतील विकासकामांसाठी सादर केलेल्या प्रस्तावांपैकी एकाही प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील १११ नगरसेवकांनी सुमारे ८०० विकास प्रस्ताव तदर्थ समितीकडे सादर केले आहेत. मात्र, हे प्रस्ताव अद्याप महासभेपुढे आले नसल्याने नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. मंजुरीची प्रक्रिया लांबल्यास चालू आर्थिक वर्षातील विकासकामांनाच फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महापालिकेवरील प्रशासकीय राजवट संपल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागांतील रस्ते, पदपथ, गटारे, उद्याने, मैदाने, शाळा आदी विकासकामांचे प्रस्ताव सादर केले. हे प्रस्ताव तदर्थ समितीकडे पाठविण्यात आले असून समितीकडून त्यांची छाननी आणि मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर संबंधित विभागांकडून अंदाजपत्रके तयार होणार असून महासभेची मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामांना प्रारंभ असा पुढील टप्पा आहे. त्यामुळे प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतरही कामे सुरू होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

परिणामी, नगरसेवकांच्या कार्यकाळातील पहिले वर्ष प्रशासकीय प्रक्रियेतच जाण्याची भीती अनेक नगरसेवक व्यक्त करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सभागृहनेते सागर नाईक यांनी मात्र विकासकामांच्या प्रक्रियेला वेग येत असल्याचा दावा केला. नगरसेवक नाराज असल्याचे मान्य करण्यास त्यांनी नकार दिला.

महापालिकेचा निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करण्यात येणार असून मागील सहा वर्षांत झालेल्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महासभेमध्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावांचा समावेश नसल्याच्या प्रश्नावर, ‘अजेंड्यात विरोधकांचे प्रस्ताव असल्याचे मला वाटत नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, सहा महिन्यांनंतरही नगरसेवकांचे शेकडो प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने शहरातील विकासकामांना प्रत्यक्ष गती कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे.

सत्ताधारी नगरसेवक सातत्याने माझ्या संपर्कात असतात. त्यांच्या प्रस्तावांवर प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात काही विषय महासभेत घेण्यात आले असून या महिन्यात होणाऱ्या पुढील महासभेत आणखी प्रस्ताव मांडले जातील. नगरसेवकांनी सादर केलेले ६०० ते ८०० छोटे-मोठे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने महासभेपुढे येतील. – सागर नाईक, सभागृहनेते, नवी मुंबई महापालिका