नवी मुंबई – नवी मुंबई शहरातील बेलापूर ते ऐरोली या महापालिकाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असून या बांधकाम व्यावसायिंकाच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी, वायू प्रदूषण तसेच ब्लास्टिंगबाबत पालिकेने बांधकाम मानक नियमावली निश्चित केली असून या नियमावलीलाच फाट देत तुर्भे विभागात ध्वनी, वायू ,धूळ प्रदूषणाबाबत योग्य ती उपाययोजना न केल्याने तुर्भे विभाग कार्यालयामार्फत ७ बांधकामे सील करण्यात आली आहेत.
नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात नव्या इमारतींची तसेच पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.पालिकेकडून शहरात प्रदूषणाबाबत विविध उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे बांधकाम व्यावसायिंकांमार्फत मात्र दुर्लक्ष केले जात आहे. तुर्भे विभाग कार्यालया अंतर्गत महापालिकेच्या मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्या ७ विकासकांवर काम बंद करण्याची कारवाई नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभागामार्फत करण्यात आली आहे.
शहरात पालिकेने बांधकामाबाबत नागरीकांकडून येणाऱ्या तक्रारींबाबत योग्य ते निराकारण होण्यासाठी समिती गठीत केली व त्यासमितीद्वारे २६ ऑगस्टला २०२४ ला प्रमाणित संचालन नियमावली अर्थात एसओपी जाहीर केली आहे. परंतू बांधकाम व्यावसायिंक पालिकेच्या नियमावलीला वाटाण्याच्या अक्षता लावत असून नियमावलींचा भंग करत असल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. पालिकेने केलेल्या कारवाईत तुर्भे विभागाअंतर्गत येणाऱ्या सानपाडा भागातील ७ विकासकांवर कारवाई केली आहे.
नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पुर्नविकास तसेच नव्या इमारतींच्या बांधकामांना वेग आला आहे. शहरातील बांधकामाबाबत पालिकेने नियमावली निश्चित केली आहे.परंतू पालिकेच्या बांधकाम व्यावसायिकांकडून मात्र नियमावलींचे उल्लंघन होत असल्याच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. नवी मुंबई शहरात वाशी, नेरुळ, सीवूड्ससह विविध उपनगरात मोठ्या प्रमाणात नवीन व पुर्नविकासाची बांधकामे सुरु आहेत. परंतू पालिकेने केलेल नियम बांधकाम व्यावसायिक पायदळी तुडवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नवी मुंबई शहरात पालिका वायू प्रदूषणाबाबत खबरदारी घेत असताना काही बांधकामाच्या ठिकाणी अेक्यूआय ३०० च्या पुढे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने तुर्भे विभागात कारवाई केली आहे.
नियम पाळा अन्यथा कारवाई होणारच …
बांधकाम व्यावसायिकांनो नियमावलींचा भंग केल्यास पालिकेच्या नियमावलीप्रमाणे काम बंद करण्यात येणार आहे . तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. तुर्भे विभागातील ७ विकासकावर कारवाई करण्यात आली असून दंडही आकारण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या काही बांधकाम ठिकाणी हवा गुणवत्ता पातळी ३२५ पर्यंत गेल्याची नोंद झाली होती.- सागर मोरे, सहाय्यक आयुक्त ,तुर्भे विभाग
या विकासकावर केली कारवाई
मे.साई अमृत बिल्डर्स भूखंड क्रमांक १६,१७ सेक्टर २० सानपाडा
मे.मेट्रीक्स बिल्डर्स भूखंड क्रमांक १० सेक्टर १९ सानपाडा
मे.प्रोग्रेसीव्ह डेव्हलपर्स भूखंड क्रमांक १२ सेक्टर २० सानपाडा
मे.कामधेनु ग्रीन भूखंड क्रमांक ६,७,सेक्टर सेक्टर १९ सानपाडा
मे.रॉयल पाम डेव्हलपर्स भूखंड क्रमांक ९ बी सेक्टर २० सानपाडा
मे.कामधेनू लाईफ स्पेस भूखंड क्रमांक ६,७ सेक्टर ८ सानपाडा
मे.सत्यम लाईफ स्पेस, भूखंड क्रमांक ७ सेक्टर १६ ए सानपाडा

