नवी मुंबई : शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका सभागृह नेते सागर नाईक यांनी ‘नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरण-२०२६’ मांडले होते. हे धोरण सदस्यांच्या सूचनांसह मंगळवारी झालेल्या तहकूब महासभेत मंजूर करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून महापालिका रुग्णालये आणि अतिविशेष उपचार सुविधांपर्यंतची व्यवस्था एकमेकांशी जोडण्यावर या धोरणात भर देण्यात आला आहे. धोरणाची अंमलबजावणी तातडीने सुरू करून त्याचा प्रगती अहवाल दर महिन्याला महासभेत सादर करण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी प्रशासनाला दिले.
धोरणाची माहिती देताना सागर नाईक यांनी नवी मुंबईतील विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये समन्वयाची गरज व्यक्त केली. प्रत्येक आरोग्य सुविधेची भूमिका निश्चित करून रुग्णांना गरजेनुसार पुढील स्तरावरील उपचारासाठी पाठविण्यासाठी संदर्भ सेवा व्यवस्था उभारली जाणार आहे. वाशी, ऐरोली आणि नेरुळ येथील रुग्णालयांमध्ये उपलब्ध सुविधांचा परस्पर वापर करण्यासाठी शटल सेवा सुरू करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली. ऐरोली आणि नेरुळ येथून वाशी रुग्णालयात एमआरआयसाठी रुग्णांना नेण्यासाठी नियमित शटल सेवा देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी रिक्त पदे भरणे, आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करणे, रुग्णालयांसाठी केंद्रीय भांडार आणि स्वतंत्र धुलाईगृह उभारणे, तसेच आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवण्यावर धोरणात भर आहे. नवी मुंबईकरांना आवश्यक उपचारांसाठी मुंबईत जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी हृदयविकार, मेंदूविकार यांसह अतिविशेष उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे.
चर्चेदरम्यान शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी वाशी रुग्णालयातील १ हजार ८०८ मंजूर पदांपैकी ६७६ पदे रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित केला. २६ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, औषधे, ऑक्सिजन आणि आपत्कालीन सुविधा वाढविण्याची मागणी त्यांनी केली. भाजप नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी नगरसेवकांच्या निधीतून प्रत्येकी २० लाख रुपये आरोग्य सुविधांसाठी राखून ठेवण्याची सूचना केली. तसेच अतिदक्षता उपचार केंद्र आणि भाजलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची मागणी केली.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे विशाल विचारे यांनी पावसाळ्यातील आजारांसाठी नागरी आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुविधा वाढवून बाह्यरुग्ण विभागाची वेळ वाढवावी, अशी मागणी केली. नेरुळमधील रखडलेले रुग्णालय सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.
आयुक्तांच्या जागी विराजमान असलेल्या उपायुक्त संजय शिंदे यांनी सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. आरोग्यविषयक डिजिटल सुविधा, माहितीचा तक्ता आणि माहिती सुरक्षेचाही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर सुजाता पाटील यांनी धोरण तातडीने टप्प्याटप्प्याने राबविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक महिन्यात धोरणाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल सभागृहासमोर ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर हा प्रस्ताव सदस्यांच्या सूचनांसह सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
‘टाइमपास’च्या वक्तव्यावरून खडाजंगी
एकात्मिक आरोग्य धोरणावरील चर्चेदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे गटनेते मनोज हळदणकर यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या ३१ वर्षांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. हा प्रस्ताव केवळ चर्चा करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी आणल्याची टीका करत हळदणकर यांनी त्याला ‘टाइमपास’ म्हटले. या वक्तव्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. महापौर सुजाता पाटील यांनी हे वक्तव्य सभागृहाचा अपमान करणारे असल्याचे सांगत माफी मागण्याची सूचना केली. ‘विषय नवी मुंबईच्या आरोग्याचा आहे, त्यावरच बोला,’ असे निर्देशही देण्यात आले. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झाली.
