नवी मुंबई : शहरात प्रथमच ५१ नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांद्वारे आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. १९ केंद्रांद्वारे ही सेवा दिली जात असून आणखी ४० केंद्रांची यात भर पडणार आहे. दुपारी २ ते रात्री १० पर्यंत ही सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारच्या सत्रातही आरोग्यसुविधा मिळणार आहे.
शहरात दर्जेदार आणि खासगी रुग्णालयांची मोठी संख्या असताना शहरातील सर्वसामान्य नागरिकांना करोना काळात दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचे काम नवी मुंबई महापालिकेने केले होते. एकीकडे नवी मुंबई शहरात खासगी रुग्णालयांची वाढती संख्या व त्याचा वैद्यकीय खर्च सामान्य नागरिकांना परवडण्याच्या पलीकडे जाऊन पोहचला असताना नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पालिका वाशी, बेलापूर, नेरुळ, तुर्भे, ऐरोली, कोपरखैरणे येथील सहा रुग्णालयांमार्फत आरोग्यसेवा दिली जाते. शहरात असलेल्या २६ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत स्थानिक पातळीवर नागरिकांना आरोग्यसेवा पुरवल्या जात आहेत.
महापालिका क्षेत्रात काही पालिकेच्या तर काही भाड्याच्या जागेत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू आहेत. त्यात वाढ होऊन आता एकूण ५९ आरोग्यवर्धिनी केंद्रांद्वारे उपचार केले जाणार आहे. यातील ४० आरोग्यवर्धिनी केंद्र ही पालिका क्षेत्रातील विविध उड्डाणपूल काही मैदाने येथे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने तयारीही केली असून अनेक ठिकाणी या पोर्टाकेंद्राची निर्मितीही केली आहे.
नवी मुंबई शहरातील नागरिकांना १९ आरोग्यवर्धिनी केंद्रांद्वारे चांगली आरोग्यसेवा दिली जात असून त्यात ४० आरोग्यवर्धिनी केंद्रांची वाढ होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत या आरोग्यवर्धिनी केंद्रांत आरोग्यसुविधा उपलब्ध होणार आहेत. – डॉ. राजेश म्हात्रे, मुख्य वैद्यकीय अधिकारी
