नवी मुंबई: नवी मुंबईतील पामबीच मार्गावर अपघातांचा सिलसिला कायम असून शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सुदैवाने यात कोणाचा मृत्यू झाला नसून किरकोळ जखमी झाले आहेत. तर अपघातास कारण असणारे युवक पळून गेले असून त्यांचा शोध वाशी पोलीस घेत आहेत.
नवी मुंबईत शीव पनवेल मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून वाशी ते सीबीडी असा ९ किलोमीटरचा बाय पास मार्गाचे निर्माण सिडकोने केले होते हा मार्ग शहरांतर्गत असला तरी एखाद्या महामार्ग सारखा सहा पदरी असून रहदारी कमी असलेला मार्ग आहे. मात्र शहरात गाड्यांचे प्रमाण वाढल्याने आता येथेही गाड्यांची गर्दी दिसून येते मात्र रात्रीच्या वेळी बऱ्यापैकी मोकळा मार्ग असतो. त्यामुळे रात्री सुसाट वेगात गाड्या धावत असतात. या मार्गावर दर काही दिवसांनी होणाऱ्या अपघातामुळे वेगमर्यादा ६० किलोमीटर प्रतितास असावी असा निर्बंध घातला गेला आहे. मात्र रात्रीच्या वेळी हा नियम फारसे कोणी पाळत नाही परिणामी अपघात होत असतात.
असाच अपघात शनिवारी झाला. रात्री सव्वा बारा वाजता पुणे मुंबई मार्गाचा भाग असणाऱ्या शीव पनवेल मार्गावर वाशी येथील जुई उड्डाणपुलाखाली बेलापूर मार्गिकेवर हा अपघात झाला. शीव पनवेल मार्गाच्या वाशीतील जुई उड्डाणपुलाच्या खाली पाम बीच वर मोराज सर्कलच्या दिशीला १०० मीटर अंतरावरील एरेंजा सर्कल ते मोराज सर्कल या दिशेने भरदार वेगाने जाणाऱ्या मारुती स्विफ्ट क्रमांक (एम एच ०३ एआर ९२९८) या गाडीने दुभाजक ओलांडून करून मोराज सर्कल ते एरेंजा ऑरेंज सर्कल अशा जाणाऱ्या गाडी होंडा सिटी (क्रमांक एमएच ४३ सी एम ३२२३ ) या गाडीला ठोकर मारून मारली . यात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी नाही. दोन्ही गाड्या टोचन च्या साहाय्याने बाजूला घेवून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती देताना वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले कि अपघातास कारण असणाऱ्या गाडीत काही युवक होते. अपघात झाल्यावर सर्व जण पळून गेले असून त्यान्हा शोध घेतला जात आहे.
चौकट : याच मार्गावर ३ मार्च रोजी दुचाकीला एका कारणे दिलेल्या धडकेत प्रशांत विजय जमदाडे (२३) आणि हरमन कौर (१७) यांचा अपघात झाला होता. यात जमदाडे याचा जागीच मृत्यू झाला तर कौर हिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. यात अद्याप आरोपी शोधण्यात सानपाडा पोलिसांना यश आले नाही तर ६ फेब्रुवारी २०२३ ला पाम बीच वाशी येथेच मर्सिडीज आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील अनिल गमरे आणि संकेत गमरे या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता. तर छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत.
