नवी मुंबई : पाम बीच मार्गालगत ७.५ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र, ११.५८ कोटी खर्चांचा हा प्रकल्प वादात सापडला होता. त्यातच सध्या हा ट्रॅक केवळ नावापुरता उरला असून अपूर्ण काम, झाडांचा अडथळा व चिखल यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.महापालिकेने शहरात पर्यावरणपुरकतेसाठी सायकल ट्रॅकची निर्मिती केली खरी पण ती आता नावापुरती उरली आहे. पालिकानिर्मित हा ट्रॅक हा सलग नसून पाम बीच मार्गावर विविध ठिकाणी तो पुन्हा रस्त्यावर वळवण्यात आल्याने अपघाताचा धोका आहे.

सायकल ट्रॅकची निर्मिती करताना पर्यावरणपुरक गोष्टींचा वापर करण्याची सूचना महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) यांनी १६ फेब्रुवारी २०२१ मध्ये केली होती. प्रत्यक्षात पाम बीच मार्गालगत तयार करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकची सध्या दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. तर काही ठिकाणी चिखलही झाला आहे.

महापालिका मुख्यालयाच्या जवळून सुरू होणारा सायकल ट्रॅक हा मोराज सर्कलपर्यंत होता. त्यानंतर त्यात बदल करण्यात आला. याचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप अनेक माजी लोकप्रतिनिधींनी केला होता. त्यावरुन वादंगही निर्माण झाले होते. सध्या या ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. अक्षर चौकापासून पुढे चाणक्य चौकापर्यंतच्या सायकल ट्रॅकच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. करावे गाव परिसराच्या पुढील भागात याचे काम अपूर्ण असून तेथे चिखल साचला आहे. त्यामुळे चालणाऱ्यांना तसेच सायकल चालवणाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. अवतार सिंग या सायकलपटूचे पाम बीचवर अपघाती निधन झाले होते. त्यामुळे पालिकेने बनवलेला सायकल ट्रॅक खरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत शहर अभियंता यांना संपर्क केला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

नवी मुंबई महापालिका सुविधा देते, परंतु त्याची निगा राखत नाही. सायकल ट्रॅकवर अनेक अडथळे आहेत. मध्येच झाडे आहेत. अनेक ठिकाणी चिखल झाला आहे. त्यामुळे पालिकेने योग्य ती खबरदारी घ्यावी. – रुपेश सिंग, हौशी सायकलपटू

नवी मुंबई शहरात सायकल ट्रॅक बनवला जाणार अशी मोठी घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नाही. सिग्नलवरुन सायकल जाताना सायकलपटूंसाठी वेगळी सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे आहे. सायकल ट्रॅक बनवताना तो रस्त्याच्या दोन्ही बाजुला असावा, मात्र येथे तो एकाच दिशेला असून तोही अपूर्ण आहे. – चेतन शहा, अध्यक्ष, मुंबई सायकलिंग इथ्युजियास्ट्स