नवी मुंबई : पाम बीच रोडवर अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. वाशीतील कोपरी गाव सिग्नल, सतरा प्लाझा सिग्नल ते एपीएमसी मार्केट सिग्नलदरम्यानची स्थिती गंभीर आहे. गॅरेजमधील वाहने थेट रस्त्यावर दुरुस्त केली जात असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर बेशिस्त पार्किंगला लगाम घालण्यासाठी एपीएमसी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या भागात दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. एपीएमसी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये ९,६२१ तर २०२५ मध्ये आत्तापर्यंत ४,४०२ अशा एकूण १४,००० हून अधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाया मोटार वाहन कायद्याच्या कलम १२२ आणि १७७ अंतर्गत केल्या गेल्या आहेत, ज्यात रस्त्यात अडथळा निर्माण करणे किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन उभे करणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जातो. त्यासोबतच गंभीर प्रकरणांमध्ये काही वाहनांवर थेट जप्तीची कारवाईही करण्यात आली आहे. एपीएमसी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम १०२ नुसार सार्वजनिक ठिकाणी धोका निर्माण करणाऱ्या किंवा अडथळा ठरणाऱ्या १६ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय, निष्काळजीपणाने इतरांच्या जीविताला धोका पोहोचवणाऱ्या पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी कलम २८४ अंतर्गत ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या गुन्ह्यांत आरोपीला शिक्षा किंवा तुरुंगवासाचीही तरतूद आहे.
गॅरेज, हॉटेल्स आणि दुकानांमुळे कोंडी
पाम बीच रोडच्या कडेला असलेली अनेक गॅरेज, हॉटेल्स, व्हॅले पार्किंग, पार्ट्स विक्री दुकाने आणि नवीन-जुनी वाहने विकण्याची दुकाने यामुळे वाहतुकीची परिस्थिती अधिकच बिघडली आहे. ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या करून दुरुस्ती केली जात असल्याने वाहतूक सुरळीत राहणे अशक्य झाले आहे. यामुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले असून, दररोजच्या कोंडीत वेळ आणि इंधन वाया जात असल्याची त्यांची तक्रार आहे.
…तर दुकानांवरही कारवाई
पाम बीच रोडवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाईच पुरेशी नाही, असे वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. या भागातील दुकाने, गॅरेज, हॉटेल्स यांनी पोलिसांना सहकार्य करून रस्त्यावरील अडथळे कमी करण्यास मदत करावी. तसेच महापालिकेनेही अशा दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पाम बीच रोड वाहनांसाठी गतिशील राहावा म्हणून सर्व प्रयत्न सुरू आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक व जप्तीची कारवाईदेखील करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच नियंत्रणात येईल. – शिवाजी भांडवलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी वाहतूक विभाग