पनवेल: व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका आता हॉटेल व्यवसायालाही बसू लागला आहे. पनवेल आणि खारघर परिसरातील अनेक हॉटेलांनी मेन्यूकार्डवरील डोसा, वडा, पुरीसारखे तळलेले पदार्थ तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हे पदार्थ न देण्याचा निर्णय हॉटेलचालकांनी घेतल्याने ग्राहकांचा हिरमोड होत असून हॉटेल व्यवसायावरही संकटाची छाया पसरली आहे.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सुमारे दोन हजार हॉटेल व्यवसाय कार्यरत आहेत. या हॉटेलांमध्ये जवळपास १५ हजारांहून अधिक कामगार काम करतात. मात्र अलीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक हॉटेलचालकांना आपल्या मेन्यूमध्ये बदल करावा लागला आहे.
हॉटेल बंद करण्याची वेळ येऊ नये आणि त्यात काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी काही हॉटेलचालकांनी युद्ध संपण्याचा निर्णय येईपर्यंत टिकाव लागावा यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पुढाकार घेत मेन्यूकार्डवरील तळलेले पदार्थ काढून टाकले आहेत. डोसा, वडा, पुरी यांसारख्या पदार्थांसाठी जास्त प्रमाणात गॅस लागतो. त्यामुळे सध्या अनेक हॉटेलांमध्ये उपमा, शिरा, इडली, कांदेपोहे यांसारखे कमी गॅस लागणारे पदार्थ ग्राहकांना दिले जात आहेत.
याशिवाय अनेक हॉटेलांमध्ये खर्च कमी करण्यासाठी वेटर आणि इतर कामगारांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना अपेक्षित सेवा मिळत नसल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अप्रत्यक्ष परिणाम नवी मुंबई आणि पनवेलमधील हॉटेल व्यवसायावर होत असल्याचे दिसून येत आहे.नवी मुंबई हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद शेट्टी यांनी सांगितले की, “हॉटेल बंद करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र परिस्थिती गंभीर आहे. सध्या आमच्यासमोर कामगारांना जेवण कसे द्यावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात कामगार टिकवणे अवघड असते, त्यामुळे त्यांना कामावरून कमी करणेही परवडणारे नाही.”
सरकारने प्रत्येक हॉटेलला कामगारांच्या संख्येनुसार किमान दोन ते तीन व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा नवी मुंबईतील हजारो हॉटेल अचानक बंद होण्याची भीती हॉटेलचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
