नवी मुंबई : बेलापूर येथील पारसिक हिल टेकडी परिसरात ‘होंडा सिटी’ कार डोंगराच्या उतारावरून थेट रेल्वे रुळावर कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या अपघातात कारमधील २८ वर्षीय तरुण जखमी झाला असून, त्याला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. या अपघातामुळे बेलापूर-उरण मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, कार रुळावरून हटविण्याचे काम सुरू आहे.
पारसिक हिल टेकडी परिसरात ही घटना घडली. पारसिक हिल बोगद्याच्या वरच्या बाजूला असलेल्या परिसरातून कार खाली येऊन थेट बेलापूर-उरण रेल्वे मार्गावरील रुळावर कोसळली. कारच्या नंबर प्लेटवरून ही कार मुंबईतील नोंदणीची असल्याचे दिसून येत आहे. रुळावर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.
बेलापूर विभागाचे अग्निशमन अधिकारी शाबीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला दुपारी साडेतीनच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा कार रेल्वे रुळावर पडलेली होती. कारमध्ये २८ वर्षीय तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे खान यांनी सांगितले.
दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही कार बेलापूर-उरण रेल्वे मार्गावरील रुळावर कोसळली आहे. कार रुळावरून हटविण्याचे काम रेल्वे पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. अपघातामुळे उरणच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडी रुळावरच थांबविण्यात आली. रेल्वे सेवा तातडीने सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
कार रुळावर कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना काही काळ गैरसोयीला सामोरे जावे लागले. रुळावरील कार हटविल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. घटनास्थळी रेल्वे पोलीस तसेच अग्निशमन दलाचे पथक आवश्यक कार्यवाही करत आहे.
कार डोंगराच्या उतारावरून नेमकी कशी खाली आली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अपघाताच्या वेळी कारमध्ये नेमके किती जण होते, वाहन कोण चालवत होते आणि अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
