नवी मुंबई : अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कठोर पाऊल उचलत एका सराईत तस्कराला ‘पिट एनडीपीएस’ कायद्यांतर्गत एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासातील ही पहिली, तर महाराष्ट्रातील दुसरी अशी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

‘नशामुक्त भारत २०२८’ अभियानांतर्गत शहरातील अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वारंवार अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्या आरोपींची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार गंभीर आणि सातत्याने गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला दिले होते.

या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजन बाळा राठोड याच्यावर लक्ष केंद्रीत केले. पोलिसांच्या माहितीनुसार, राठोड हा मुंबई परिसरातून नवी मुंबईत येऊन विविध भागांत अंमली पदार्थांची विक्री करत होता. त्याच्या हालचालींवर काही महिन्यांपासून पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत होती.

राठोड याच्याविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत चार गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय खुनाचा प्रयत्न, मारामारी, दरोडा यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या आणखी पाच गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये असल्याचे तपासात समोर आले. वारंवार कारवाई होऊनही त्याच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये कोणतीही घट दिसून आली नसल्याने पोलिसांनी कठोर कायदेशीर पर्यायाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपीविरोधात ‘पिट एनडीपीएस’ (Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आला. आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तसेच समाजावर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर अहवाल या प्रस्तावासोबत जोडण्यात आला होता. गृह विभागाने प्रस्तावाची छाननी केल्यानंतर त्यास मंजुरी दिली. त्यानंतर पोलिसांनी राठोड याला ताब्यात घेऊन पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले.

पोलिसांच्या मते, अंमली पदार्थांची तस्करी ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नसून तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे ढकलणारा गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. त्यामुळे अशा सराईत आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून तस्करीचे जाळे मोडून काढण्यावर भर दिला जात आहे.

दरम्यान, ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र ओव्हाळ, निलेश धुमाळ, तुषार माने तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

‘पिट एनडीपीएस’ कायदा काय?

अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीमध्ये सातत्याने सहभागी असलेल्या आरोपींना प्रतिबंधात्मक पद्धतीने स्थानबद्ध करण्याची तरतूद ‘पिट एनडीपीएस’ कायद्यात आहे. या कायद्यानुसार आरोपीला न्यायालयीन खटल्याव्यतिरिक्त ठरावीक कालावधीसाठी कारागृहात ठेवता येते. अंमली पदार्थांच्या संघटित तस्करीला आळा घालण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा मानला जातो.