नवी मुंबई: हेरॉईन या अमली पदार्थ प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केले असून त्याच्या कडून ७ लाखांचे हेरॉईन जप्त केले आहे. हेरॉईन हा अमली पदार्थ पुरवठा करणाराच अटक करण्यात आल्याने हे अमली पदार्थ विरोधी पथकाचे मोठे यश मानले जात आहे.
साहेब सिंग उर्फ सभा जोगिंदर सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पंजाब मधील अमृतसर येथून अटक करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी एपीएमसी पोलीस ठाण्यात हेरॉईन या अमली पदार्थ प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना सिंग हा उजेडात आला. सिंग हाच नवी मुंबईत येणाऱ्या हेरॉईनचा एक पुरवठादार असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी कसून तपास सुरु केला.
तांत्रिक विश्लेषण करून त्याला अटक करण्याचा दोन वेळा केलेला प्रयत्न असफल झाला. मात्र तिसऱ्या वेळेस त्याला अटक करण्यात यश आले. त्याच्या कडून ७ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
स्वतःच्या बँक खात्यातूनच व्यवहार
संशयित आरोपी सिंग हा हेरॉईनच्या व्यवहारातील पैसे हे ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यात स्वीकारत असल्याचे तपासात समोर आल्याने त्याचे नाव उघडकीस आले आणि त्याची पूर्ण ओळख पटली . मात्र तो वापरात असलेला मोबाईल अधून मधून बंद करत असल्याने तांत्रिक तपासात अडचणी येत होत्या. मोबाईल बंद करीत असल्याने त्याचे लोकेशन मिळवणे अवघड झाले होते. मात्र तपासात सातत्य राखल्याने तसेच तो वापरात असलेल्या मोबाईलच्या आसपास कुठला मोबाईल ऍक्टिव्ह आहे याचा तांत्रिक तपास केल्यावर तो चार मोबाईल वापरात असल्याचे स्पष्ट झाले. हे चारही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पुन्हा एकदा पंजाब कनेक्शन :
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शखाली नशा मुक्त नवी मुंबई अभियान गांभीर्याने राबवत आहेत. २०२५ मध्ये नेरुळ येथील एका कारवाईत नवी मुंबईत पंजाब मधून अमली पदार्थाचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. पंजाब मध्ये अनेक जण या व्यवसायात असल्याने नवी मुंबईत पुरवठा कोण कोण करतो याची माहिती मिळत नव्हती. याच गुन्ह्याचा तपास करीत असताना केलेल्या कारवाईत अजून चार गुन्हे नोंद करण्यात आले. तसेच एकूण २८ जणांना यापूर्वी अटक करण्यात आले आहे. त्यात दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आलेला सिंग हा २९ वा आरोपी आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी पंजाब मधील तरंतरण आणि घरींदा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ हवालदार तायडे, खिलारे, चव्हाण आणि धोंडे यांनी केली आहे.

