नवी मुंबई – गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रवेश करून वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्हीतील एका संशयिताच्या छायाचित्राच्या आधारे तपासाची सूत्रे हाती घेत पोलिसांनी तीन आरोपींना मिरा रोड परिसरातून अटक केली. या आरोपींकडून नवी मुंबईसह विविध ठिकाणी घडलेल्या सुमारे नऊ गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यांमध्येही दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी व इतर मालमत्तेविरोधातील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोरट्यांकडून १२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून यामध्ये ९५ ग्रॅम वजनाचे सोने आणि दोन दुचाकींचा समावेश आहे. 

१५ मे रोजी खांदेश्वर येथील एका गृहनिर्माण सोसायटीत घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका संशयिताचे छायाचित्र स्पष्ट दिसून आले होते. त्यानंतर ठाणे, मुंबई व उपनगरांतील गुन्हे नोंदवहीतील सराईत गुन्हेगारांची माहिती पडताळण्यात आली. तांत्रिक तपास, गुन्हेगारी रेकॉर्ड आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांची ओळख निश्चित करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले.

तपासात आरोपी मिरा रोड परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्यावर मिरा रोडसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, अमली पदार्थ तस्करी आणि इतर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. नवी मुंबईत चोरी केल्यानंतर हे आरोपी चोरीतील सोन्याची विल्हेवाट लावत आणि त्यानंतर पश्चिम बंगाल व बिहार येथील त्यांच्या मूळ गावी निघून जात असल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.

नवी मुंबई पोलीस क्राईम ब्रॅंचच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, महेश जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश वाट, पोलीस हवालदार संजय राणे, नितिन जगताप,  सतीश चव्हाण, पोलीस नाईक सचिन टिके, अजय कदम यांच्या पथकाने मिरा रोड परिसरात सापळा रचून दोघांना तर एकाला बिहार येथून नवी मुंबई पोलिसांनी रियाज रमजान शेख उर्फ रियाज आलम रमजान अली, जमालबादशाह मनिरूल गाझी, आशिक बिल्ला गाझी या तिघांना ताब्यात घेतले. 

चौकशीत त्यांच्याकडून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रवेश करून वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या आणि दुचाकी चोरीच्या सुमारे नऊ गुन्ह्यांची उकल झाली. अटकेतील एका आरोपीने काही वर्षांपूर्वी कामोठे येथील भंगार व्यवसायिकाकडे काम केल्याने पनवेल व परिसरातील रस्त्यांची माहिती त्याला होती. त्यामुळे चोरीनंतर दुचाकीवरून वेगाने पसार होण्यासाठी तो परिचित मार्गांचा वापर करत असल्याचे तपासात उघड झाले.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या रियाज शेख याच्यावर ८ गुन्हे तर जमालबादशाह याच्यावर सहा गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे उघड झाले आहे. सध्या हे तिन्ही आरोपींची सोमवारी पोलीस कोठडी संपल्यावर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. त्यांच्या अटकेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील अशा प्रकारच्या साखळीचोरींना आळा बसण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.