पनवेल – नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्तांच्या खातेवाटपाला अखेर अंतिम स्वरूप देण्यात आले असून वाहतूक, विशेष शाखा, मुख्यालय प्रशासन आणि परिमंडळांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलेल्या या फेरबदलांमुळे विविध विभागांच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.राज्य गृह विभागाने अलीकडेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर नवी मुंबई पोलीस दलातील काही महत्त्वाची पदे रिक्त झाली होती.

त्यानंतर नव्याने दाखल झालेल्या पोलीस उपायुक्तांना खातेवाटप करण्याकडे पोलीस दलासह नागरिकांचेही लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त भारंबे यांनी विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. नव्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्याकडे वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील वाढती वाहतूक आणि रस्ते व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा विभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी या विभागाचा कारभार तिरुपती काकडे यांनी सांभाळला होता.

पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्याकडे पोलीस मुख्यालय प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांना विशेष शाखेचा पदभार देण्यात आला असून परिमंडळ-१ साठी विजय खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीपासून विशेष शाखेत कार्यरत असलेल्या रश्मी नांदेडकर यांच्याकडे परिमंडळ-३ अर्थात पनवेल-उरण क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस दलात २२ पोलीस ठाणी असून सुमारे ४,८८० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

याशिवाय सोमवारी चार पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्यांचे आदेशही सोमवारी (ता.१) जाहीर करण्यात आले. त्यानुसार अजय शिंदे यांची मध्यवर्ती गुन्हे शाखेत, विकास घोडके यांची वाशी गुन्हे शाखा कक्ष-१ मध्ये, तानाजी भगत यांची पनवेल गुन्हे शाखा कक्ष-३ मध्ये, तर अविनाश काळदाते यांची ईएमसी शाखेत नियुक्ती करण्यात आली. अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्या. तसेच नागरिकांना ऑनलाइन पोलीस सेवा आणि विभागीय माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्यावरही आयुक्तालयाने भर दिला आहे.

सर्वसामान्य नवी मुंबईकरांना कोंडीमुक्त वाहतूक देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल तसेच शहरातील वारंवार अपघात होणारे ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी माझा प्रयत्न असेल. – राहुल खाडे, उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शाखाली या पदाची नेमूण दिलेली कर्तव्य यशस्वी पार पाडणे तसेच पोलीसांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल – विशाल ठाकूर, उपायुक्त, मुख्यालय प्रशासन, नवी मुंबई पोलीस नवी मुंबई पोलिसांनी २०२४ साली ८ लाख ८७ हजार कारवाई केली.

तर २०२५ साली ९ लाख ८० हजार कारवाईचा टप्पा गाठला. तसेच २०२४ साली २८६ जण अपघातात मृत्यू झाली तर २०२५ मध्ये २६७ जणांचा अपघातामध्ये गमावली. प्रत्येक घरात किमान एकतरी वाहन असलेले नवी मुंबईतील विविध उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी व अपघातप्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी वाहतूक विभागात अजून अत्याधुनिक यंत्रणेसह मनुष्यबळ नेमावे लागेल. नवी मुंबईतील पोलिसांना सध्या महापालिकांकडून वाहतूक वार्डन दिल्याने त्यांच्यावरील ताण अनेक ठिकाणी कमी असला तरी उपायुक्त खाडे यांना नवी मुंबई विमानतळ व जेएनपीए प्रकल्पाच्या दृष्टीने वाहनांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या ठिकाणी वाहनतळासारख्या मुद्यावर नियोजनकार स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध नियोजन प्राधिकरणांसमोर ठाम भूमिका घ्यावी लागेल.