नवी मुंबई: नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिक ते चाकण असा थरारक अमली पदार्थ तस्करांचा पाठलाग करत तीन तस्करांना अटक केली आहे.  पंजाब हुन नवी मुंबईत हेरॉईन आणले जात होते. आरोपींच्या अटकेने पुन्हा एकदा पंजाब कनेक्शन समोर आले आहे. मात्र नवी मुंबई पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईने आता पर्यंत पंजाब मधून हेरॉईन आणणाऱ्या ४० जणांना अटक केलेले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांनी दिली.

बलजीत सिंग सविंदर सिंग उर्फ मोनु, गुरु प्रतापसिंग शरणजीत सिंग उर्फ गोपी व ट्रक चालक करमजीतसिंग  मनिंदरसिंग   असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे सर्व मूळ पंजाब येथील आहेत. पोलीस आयुक्त,  मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त , दिपक साकोरे व गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त  सचिन गुंजाळ यांनी “नशा मुक्त भारत २०२८” या अभियानाच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थाच्या तस्करीविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.

 तळोजा पोलीस स्टेशन मध्ये हेरॉईन प्रकरणी एक गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी  बलजीत सिंग व त्याचा साथीदार गोपी दोन्हीहे ट्रकद्वारे नवी मुंबई, मुंबई व पुणे परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे समोर आले. तांत्रिक तपासात हे संशयित आरोपी  मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात येत असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुशंघाने सहाय्यक  पोलीस आयुक्त,  धर्मपाल बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संदीप निगडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक  निलेश धुमाळ, पोलीस हवालदार तायडे, धोंडे, पालवे,  चव्हाण हे पथक नाशिक येथे दबा धरून बसले. संशयित ट्रक येत असल्याचे दिसताच नाशिक येथून संबंधित आरोपींच्या  ट्रकचा पाठलाग करून पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी  निगोजे गाव, पिंपरी चिंचवड परिसरात कारवाई करून  बलजीतसिंग सविंदर सिंग उर्फ मोनू,  गुरु प्रतापसिंग शरणजीत सिंग उर्फ गोपी व ट्रक चालक करमजीतसिंग मनिंदरसिंग यांना ताब्यात घेत ट्रकची व संशयित आरोपींची झडती घेतली.

या झडतीत आरोपी कडून  ८२.६ ग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन त्याचे बाजार मूल्य ४१ लाख ३० हजार, १ ऑस्ट्रिया निर्मित ८ लाखांची ग्लोक पिस्टल २ मॅगझिन, ४ जिवंत काडतुसे ज्याचे मूल्य दोन लाख ५० हजार रुपये आहे. तसेच त्यांचेकडील ४ मोबाईल व १ वजनकाटा असा एकूण सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित सर्व आरोपींना  अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपींना १८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे.