नवी मुंबई : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गस्ती पोलिसांवर मोठी जवाबदारी असते. त्यांच्यासाठी सजग ॲॅप आणि डॅश कॅमेरा देण्याची सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या हे ॲॅप प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून लवकरच पूर्ण क्षमतेने होणार आहे. शुक्रवारी झालेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली. दरम्यान २०२५ मध्ये गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई पोलिसांनी गस्त पोलीस सेवेचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांसाठी सजग ॲॅप आणि डॅश कॅमेरा दिला जात आहे. या शिवाय प्रायोगिक तत्त्वावर सजग ॲॅप हे स्मार्ट वाचप्रमाणे काम करणार आहे. गस्त पोलीस पथक ज्या-ज्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी गेले, त्याची माहिती या ॲॅपद्वारे मिळते. या शिवाय गस्त घालत असताना कोण कुठे, किती वेळ थांबले याचीही माहिती साठवली जाते. चारचाकी गाड्यांतूनही गस्त घालत असताना त्यांना डॅश कॅमेरा पुरवण्यात येत असून त्याद्वारे ज्या-ज्या ठिकाणी गस्त पथक गेले त्याचे चित्रीकरण करून ते जतन करण्यात येणार आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दहा बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. या बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. बॉडी कॅमेऱ्यामुळे पोलिसांच्या कारवाईमध्ये पारदर्शकता राहणार आहे. सजग ॲॅपमुळे त्यात अजून सुधारणा होईल अशी आशा आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालय कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कमांड सेंटरची स्थापना केली आहे. तळ मजल्यावर हे काम सुरू असून पहिल्या मजल्यावर त्याचे प्रशिक्षण केंद्र आहे.
अवघी सहा मिनिटे
एखादी छोटी मोठी घटना घडल्यावर जेव्हा वेगात अगोदर गस्त पोलीस पथक जाते त्यावेळी सजग ॲॅपचा सर्वाधिक फायदा होणार आहे. सध्या माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस सुमारे सहा मिनिटांत पोहचतात. हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान वेळ आहे.
- वर्ष – दाखल गुन्हे – गुन्ह्यांची उकल
- २०२४ – ७,३६९ – ५,६७८ (७७ टक्के)
- २०२५ – ७,८३५ – ६,२७६ (८० टक्के)
वाहतूक नियमभंगाचे ९ लाख ८० हजार गुन्हे
वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी २०२४ मध्ये एकूण ८ लाख ८७ हजार ७७० गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०२५ मध्ये हे प्रमाण वाढून ९ लाख ८० हजार ८०६ वर गेले. हेल्मेट न घालणाऱ्या २ लाख ३ हजार ४३७ दुचाकीस्वारांवर वर्षभरात कारवाई केली आहे.
