राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय. नवी मुंबई पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी केतकी चितळेला गुरुवारी (१९ मे) ठाणे कारागृहातून ताब्यात घेतले. केतकी चितळे विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यामध्ये २०२० ला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. तिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य सोशल मीडियावर करण्याचा आरोप आहे.

केतकी चितळेविरोधात २०२० मध्ये दाखल अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सप्टेंबर २०२१ मध्ये ठाणे सत्र न्यायालयाने केतकीचा जामीन अर्ज देखील फेटाळून लावला होता. त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अखेर आता या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं आहे.

केतकीसोबत आणखी ३ जणांवर देखील गुन्हा दाखल

या प्रकरणात केतकीसोबत आणखी ३ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघांचा शोध नवी मुंबई पोलीस घेत आहेत. नवी मुंबई पोलीस केतकीला शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहेत. तसेच न्यायालयाकडे तिच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.

हेही वाचा : “आम्ही निर्णय घेतला तर अशा लोकांची थोबाडं बंद करायला…”, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

केतकी चितळेची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात केतकीला अटक केल्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. बुधवारी (१८ मे) तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिची तब्बल १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

केतकीच्या पोस्टनंतर सर्वच पक्षांकडून निषेध

केतकी चितळेनं दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर त्यावर सर्वत स्तरातून आणि पक्षांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. राज्यात १० विविध ठिकाणी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला रविवारी दुपारी चौकशीनंतर ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली होती. त्यानंतर तिची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. 

केतकीच्या अटकेसाठी पोलीस वेटिंगवर!

दरम्यान, केतकी चितळेला अटक करण्यासाठी वेगवेगळ्या भागातील पोलीस वेटिंगवर असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. आज केतकीची पोलीस कोठडी संपल्यानंतर देहूरोड पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात हजर होते. मात्र, त्याआधीच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिच्या कस्टडीची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांआधी गोरेगाव पोलीस तिच्या अटकेसाठी तयार होते. त्यामुळे आधी गोरेगाव, नंतर पिंपरी चिंचवड आणि त्यानंतर देहूरोड पोलिसांकडून आता केतकी चितळेला अटक केली जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. केतकीनं तिच्या पोस्टमध्ये ‘तुका म्हणे’, या शब्दांचा वापर केल्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थानने तिच्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.