नवी मुंबई : नियोजित शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शहरातील विविध नोडमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण, रस्त्यांच्या कडांची झालेली झीज आणि पाणीसाचल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचा प्रवास धोकादायक बनला आहे. मुख्य रस्त्यांवरील दुरुस्तीची कामे तुलनेने वेगाने होत असली, तरी अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सिवूड्स सेक्टर ४६, ४८ आणि ५० या परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर डांबरीकरण उखडल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवत जावे लागत आहे. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. नियमित या मार्गावरून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी सततच्या धक्क्यांमुळे पाठदुखी आणि मणक्याच्या त्रासात वाढ झाल्याची तक्रार केली आहे.
घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, वाशी आणि रबाळे परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. निवासी वसाहती, रेल्वे स्थानके, शाळा-महाविद्यालये आणि बाजारपेठांना जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या रांगा लागत असून नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.
ऐरोली-मुलुंड टोलनाका ते दिवा गाव चौक या मार्गावरील खड्ड्यांबाबत नागरिक वारंवार तीव्र नाराजी व्यक्त करतात. या मार्गावरील देखभालीची जबाबदारी विविध यंत्रणांमध्ये विभागली गेल्याने दुरुस्तीला विलंब होत असल्याची टीका वारंवार होते. सध्या या भागात ऐरोलीहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी पॅचवर्क करण्यात आल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. ठाणे-बेलापूर मार्ग आणि शीव-पनवेल महामार्गावरील काही भागांतही पावसानंतर रस्त्यांची अवस्था बिघडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या काही मार्गांच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी समाजमाध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. नव्याने तयार झालेल्या काही रस्त्यांवर खडी सैल झाल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी धोका निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र पहिल्याच मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी डागडुजी उखडून खड्डे पुन्हा दिसू लागतात. त्यामुळे दुरुस्तीच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वाढती वाहतूक, वारंवार होणारे खोदकाम, निकृष्ट दर्जाची डागडुजी आणि देखभालीतील त्रुटी यामुळे समस्या अधिक गंभीर होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती, मॅनहोलची तपासणी आणि पायाभूत सुविधांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिक टिकाऊ दुरुस्तीसाठी डांबरी आणि काँक्रीट रस्त्यांवर भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, वारंवार येणारा पाऊस आणि रस्त्यावरील वाहतुकीमुळे खड्डे दुरुस्तीची गती संथ झाली आहे. परिणामी, नागरिकांना खड्ड्यांतून मार्ग काढत दैनंदिन प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांची मागणी
नवी मुंबईला स्वच्छ आणि नियोजित शहर म्हणून राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळत असताना, अंतर्गत रस्त्यांची सद्यःस्थिती या प्रतिमेला धक्का देणारी मानली जात आहे. त्यामुळे महापालिकेने तक्रारीची वाट न पाहता सर्व प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांचे अभियांत्रिकी सर्वेक्षण करावे, खड्ड्यांचे मॅपिंग करून कालबद्ध दुरुस्ती आराखडा जाहीर करावा आणि निकृष्ट कामांसाठी संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिक करत होत आहेत.
