नवी मुंबई : ऐरोली येथील राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती सोनम डोंगरे यांच्या मृत्यूनंतर उपचार प्रक्रियेबरोबरच वापरण्यात आलेल्या औषधांच्या गुणवत्तेचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या ड्युवाडिलन (Duvadilan) आणि डेक्सा मेथासोन (Dexa Methasone) या दोन्ही इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्यात आला असून रुग्णालयातील उपलब्ध साठा सीलबंद करण्यात आला आहे. तसेच या इंजेक्शनचे नमुने पुढील प्रयोगशाळा तपासणीसाठी ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
३० जून आणि १ जुलै रोजी सोनम डोंगरे व रिचा मिश्रा या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलांवर उपचारादरम्यान संबंधित इंजेक्शनचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर दोघींचीही प्रकृती गंभीर झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार केले. मात्र, उपचारादरम्यान सोनम डोंगरे यांचा मृत्यू झाला, तर रिचा मिश्रा यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले. महापालिकेच्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
या घटनेनंतर मृत्यूच्या कारणांबाबत विविध शक्यता तपासल्या जात असून औषधांच्या गुणवत्तेबाबत कोणताही संशय राहू नये, यासाठी संबंधित इंजेक्शनचा संपूर्ण साठा सीलबंद करण्यात आला आहे. या औषधांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आले असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर औषधांच्या गुणवत्तेबाबत स्पष्टता येणार आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, सर जे. जे. समूह रुग्णालय व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेचे प्रतिनिधी तसेच महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीला १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत उपचार करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सोनम डोंगरे यांचे शवविच्छेदन त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनुसार मुंबईतील सर जे. जे. समूह रुग्णालय व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित प्रत्येक बाबीची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. वैद्यकीय उपचारातील संभाव्य त्रुटींसह औषधांच्या गुणवत्तेचीही स्वतंत्र तपासणी केली जात असून, चौकशी आणि अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
