नवी मुंबई : नवी मुंबईतील निवासी इमारतींवरील घरपट्टी आणि पाणीपट्टीत पुढील २० वर्षे वाढ होऊ देणार नाही, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. मात्र, शहरातील दुकाने, हॉटेल्स, मोटेल्स, माहिती तंत्रज्ञान केंद्रे आणि डेटा सेंटर यांसारख्या व्यावसायिक आस्थापनांवर वाढीव कर आकारावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. महापालिकेचा महसूल वाढविण्याबरोबरच शहरातील अनावश्यक गर्दी आणि अनियंत्रित नागरीकरण रोखण्याच्या दृष्टीनेही आगामी काळात निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेतील सर्व आस्थापना आणि परिवहन उपक्रमातील कंत्राटी कामगारांना विशेष सानुग्रह अनुदान आणि दिवाळी भेट म्हणून ४५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात श्रमिक सेना युनियनच्या वतीने शनिवारी वचनपूर्ती कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गणेश नाईक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात त्यांनी महापालिकेच्या आगामी कारभाराबाबत तसेच कररचनेबाबत भूमिका स्पष्ट केली.
महापालिकेचा कारभार चालविताना कामगारांचे कल्याण आणि शहराचा विकास या दोन्ही बाबींना समान प्राधान्य दिले जाईल. नागरिकांवर करवाढ न लादता कामगारांना चांगले वेतन आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा देण्याची भूमिका कायम राहील, असे नाईक यांनी सांगितले. प्रशासकीय काळात घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र, लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात आल्यानंतरच याबाबत निर्णय व्हावा, अशी भूमिका आपण घेतली होती. निवासी मालमत्तांबाबत जनतेला दिलेला शब्द पुढील २० वर्षे पाळला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्यावसायिक आस्थापनांना वाढीव कर
निवासी मालमत्तांना करवाढीतून दिलासा देण्याची भूमिका असली तरी व्यावसायिक मालमत्तांबाबत वेगळे धोरण असेल. दुकाने, हॉटेल्स, मोटेल्स, आयटी केंद्रे आणि डेटा सेंटर यांसारख्या व्यावसायिक वापराच्या मालमत्तांवर निश्चितपणे कर वाढवावा लागेल, असे नाईक यांनी सांगितले. व्यावसायिक क्षेत्रातून महापालिकेला अधिक महसूल मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या करवाढीचे नेमके प्रमाण, दर आणि अंमलबजावणीचे स्वरूप आगामी काळात स्पष्ट होईल.
शहरातील अनावश्यक गर्दी वाढू नये आणि नवी मुंबईचे नियोजनबद्ध स्वरूप टिकून राहावे, यासाठी महापालिकेच्या सभागृहात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. नागरी पुनर्नवीकरण योजनेचा (यूआरएस) वापर करताना परिसरनिहाय परिस्थितीचा विचार केला पाहिजे. एखाद्या वसाहतीसाठी लागू केलेले धोरण शहरातील इतर भागांमध्ये सरसकट लागू करता येणार नाही. एनआरआय परिसरात भविष्यात यूआरएस लागू करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान
दरम्यान, महापालिकेतील कंत्राटी कामगारांना विशेष सानुग्रह लाभ म्हणून ७,५०० रुपये आणि दिवाळी सणानिमित्त ४५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयाच्या वचनपूर्तीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ. संजीव नाईक यांनी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे कामगारांना विविध टप्प्यांवर दिलासा मिळाल्याचे सांगितले. कंत्राटी कामगारांच्या वेतनात झालेली वाढ ही त्यांच्या कामाची दखल असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापौर सुजाता पाटील यांनी हा निर्णय केवळ वेतनवाढीपुरता मर्यादित नसून कामगारांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगितले. या निर्णयाबाबत विरोधकांकडून केवळ घोषणा केल्याची टीका करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असल्याने समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी श्रमिक सेना अध्यक्ष डॉ. संजीव नाईक, उपाध्यक्ष संदीप नाईक, उपमहापौर दशरथ भगत, सभागृहनेते सागर नाईक, सरचिटणीस चरण जाधव, विभागीय चिटणीस सूरज पाटील यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कामगार उपस्थित होते.
