नवी मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर नवी मुंबईत प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शनिवारी (४ जुलै) शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी ८.३० ते दुपारी १२ या अवघ्या साडेतीन तासांच्या कालावधीत शहरात सरासरी ४९.५० मिमी पावसाची नोंद झाली. कोपरखैरणे विभागात सर्वाधिक ७४.२० मिमी, तर ऐरोलीमध्ये ६८.६० मिमी पाऊस झाला. वाशीमध्ये ४१.२० मिमी, बेलापूरमध्ये ३८.४० मिमी, दिघ्यात ४७.१० मिमी आणि नेरुळमध्ये २७.८० मिमी पाऊस नोंदविण्यात आला.
यापूर्वीच्या २४ तासांत (३ जुलै सकाळी ८.३० ते ४ जुलै सकाळी ८.३०) शहरात सरासरी ८१.०८ मिमी पावसाची नोंद झाली होती. १ जूनपासून आतापर्यंत नवी मुंबईत एकूण ८०९.४५ मिमी पाऊस झाला आहे. मोरबे धरण परिसरातही १ जूनपासून ६०१.२ मिमी पावसाची नोंद असून धरणाची पाणीपातळी ७०.४८ मीटर म्हणजेच २९.०८ टक्के क्षमतेपर्यंत पोहोचली आहे.
महापालिकेने दुपारी २.५० वाजता ४.२६ मीटर उंचीची उधाण भरती येणार असल्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे किनारी भाग आणि सखल परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, सकाळी ८.३० ते दुपारी १२ या कालावधीत झाडे पडण्याच्या सहा, फांद्या पडण्याची एक आणि पाणी साचल्याच्या दोन घटना घडल्या. याआधीच्या २४ तासांत १६ झाडे आणि पाच फांद्या कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या होत्या.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असून शहरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महापालिकेच्या टोल-फ्री हेल्पलाईन १८००२२२३०९ किंवा १८००२२२३१० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे महापालिकेने म्हटले आहे.
रेड अलर्टमुळे खबरदारीचे आवाहन
मुंबई आणि एमएमआरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सखल भाग, समुद्रकिनारा व नाले परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.
