नवी मुंबई : जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांना योग्य माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विकासकांशी थेट संवादाची संधी मिळावी, या उद्देशाने क्रेडाई एमसीएचआय यूथ एनएमआरच्या वतीने आयोजित पुनर्विकास प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात रविवारी झालेल्या ‘इज ऑफ डुइंग रिडेव्हलपमेंट’ (ईओडीआर)च्या दुसऱ्या आवृत्तीत १,५६७ गृहनिर्माण संस्था, ३५ हून अधिक विकासक आणि दोन हजारहून अधिक नागरिक सहभागी झाले.
नवी मुंबई आणि रायगड परिसरातील अनेक जुन्या गृहनिर्माण संस्थांसमोर पुनर्विकासाचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर पुनर्विकासाची क्षमता, प्रकल्पाची व्यवहार्यता, आर्थिक गणित, विकासकाची विश्वासार्हता तसेच तांत्रिक आणि कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी प्रदर्शनात चर्चासत्रे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. विविध गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना विकासकांशी थेट चर्चा करण्याची संधीही मिळाली.
या उपक्रमाची पहिली आवृत्ती गेल्या वर्षी झाली होती. त्यावेळी सुमारे ८०० ते एक हजार गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर सुमारे २५ पुनर्विकास प्रकल्प सुरू झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यंदाच्या उपक्रमात सहभाग वाढल्याने पुनर्विकासाबाबत माहिती घेण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये वाढती उत्सुकता असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुनर्विकासासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थेची परिस्थिती वेगळी असल्याने एकच पद्धत सर्वांना लागू होऊ शकत नाही. त्यामुळे विकासकाची निवड करण्यापूर्वी संस्थेची विकासक्षमता, आर्थिक व्यवहार्यता, रहिवाशांच्या अपेक्षा आणि विकासकाचा अनुभव यांचा विचार करण्याचे आवाहन करण्यात आले. “पुनर्विकासाबाबत योग्य माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. संस्थांना उपलब्ध पर्याय समजून घेऊन निर्णय घेता यावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे,” असे क्रेडाई एमसीएचआय यूथ एनएमआरचे अध्यक्ष सुमित अहलुवालिया यांनी सांगितले.
