नवी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अंमलात आलेल्या एकत्रित बांधकाम विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन (यूडीसीपीआर) नियमावलीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या वाढीव चटईक्षेत्राच्या मुद्द्यावर महापालिका निवडणुकांच्या काळात सडकून टीका करणारे वनमंत्री गणेश नाईक यांनी शहरात याच नियमावलीच्या आधारे केला जाणारा जुन्या इमारतींचा पुनर्विकास म्हणजे ‘गगनचुंबी झोपडपट्ट्या’ असल्याची टीका गुरुवारी वाशी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

वाशी सेक्टर ९, १० यासारख्या परिसरात सध्या सुरू असलेला हा पुनर्विकास भविष्यात येथील रहिवाशांना गुदमरून टाकणारा ठरेल इतका अस्ताव्यस्त आहे, अशी भीतीही नाईक यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाचा कार्यभार असताना आखण्यात आलेल्या विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमुळे (यूडीसीपीआर) मुंबई महानगर प्रदेशासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर चटईक्षेत्र प्राप्त होत आहे.

या वाढीव एफएसआयमुळे शहराशहरांमध्ये उभ्या रहाणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि यामुळे पायाभूत सुविधांवर येणारा ताण हा मुद्दाही नियोजनकर्त्यांसाठी चिंतेचा विषय बनू पहात आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा जादा एफएसआय शहरांचे वाटोळे करेल, अशी टीका करत गणेश नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भाजपची सत्ता शहरात आली तर मर्यादित एफएसआयद्वारे पुनर्विकासाचे उत्तम प्रकल्प आखले जातील, असेही नाईक म्हणाले होते.

गुरुवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा याच मुद्द्याला हात घालत नाईक यांनी शहरात सध्या सुरू असलेल्या पुनर्विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काय म्हणाले नाईक ?

गेल्या काही वर्षांत नवी मुंबईत पुनर्विकास आणि गृहनिर्माण प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. मात्र, या प्रक्रियेत एफएसआयचा वापर ‘खैरात’ पद्धतीने केल्यामुळे शहराच्या नियोजनावर परिणाम होत आहे, असे नाईक म्हणाले. वाशी सेक्टर ९, १० भागात केला जाणारा हा पुनर्विकास इतका अस्ताव्यस्त आहे की भविष्यात येथे रहाणाऱ्या रहिवाशांचा जीव गुदमरेल अशी भीतीही नाईक यांनी व्यक्त केली.

“तुम्ही आडव्या झोपडपट्ट्यांऐवजी आता हा एफएसआय वापरून उंच, टोलेजंग झोपडपट्टया उभ्या करत आहात. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होत असेल, तर तो विकास स्वीकारार्ह नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.वाशी परिसरातील काही इमारतींचा दाखला देत नाईक म्हणाले की, गरजेपेक्षा अधिक एफएसआय मंजूर केल्यामुळे नागरिकांना मोकळा श्वास घेणेही कठीण होत आहे.

वाढती लोकसंख्या, अपुरी पायाभूत सुविधा आणि गर्दी यामुळे अशा प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान खालावत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शहराला जितका आवश्यक आहे तितकाच एफएसआय द्यावा. अनियंत्रित वाढ शहराच्या संतुलनाला बाधा आणणारी ठरते, असे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगत, नियोजनबद्ध विकासासाठी शहराला जितका गरजेचा तितकाच एफएसआय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

वाशीच्या पुनर्विकासाच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका ?

वाशी सेक्टर ९ आणि १० परिसरातील जुन्या सिडको इमारतींच्या जागी मोठया प्रमाणावर होणाऱ्या पुनर्विकासाचे शिल्पकार शिंदेंच्या शिवसेनेचे तेथील नगरसेवक किशोर पाटकर आणि अविनाश लाड हे ठरले आहेत. पाटकर यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रभागात शिवसेनेच्या विजयात हे प्रकल्प निर्णायक ठरले होते. नाईक यांनी या भागाचे दाखले देत केलेले वक्तव्य एकप्रकारे शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधल्याची चर्चा आहे.