नवी मुंबई : शहरातील तब्बल ५५ किलोमीटर रस्त्यांचे ‘टीडब्ल्यूटी’ (थिन व्हाइट टॉपिंग) पद्धतीने काँक्रीटीकरण करण्यासाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्यानंतर आता आणखी ५०० कोटी रुपयांच्या नव्या काँक्रीटीकरण प्रस्तावांची तयारी करण्यात आली होती. मात्र यापुढे सरसकट काँक्रीटीकरण न करता रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्ती आणि दीर्घकालीन नियोजनावर भर देणारे स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती सभागृह नेते सागर नाईक यांनी दिली आहे.

मागील चार ते पाच वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत नवी मुंबईतील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ‘टीडब्ल्यूटी’ची कामे करण्यात आली. या कालावधीत सुमारे ५५ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले असून त्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांचा खर्च झाला. एवढ्यावरच न थांबता विविध प्रभागांमधील आणखी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांची नवी कामे हाती घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

भूमिगत सुविधांसाठी पुन्हा रस्तेखोदाई

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सागर नाईक यांनी, नवी मुंबई हे अद्याप विकसित होत असलेले शहर असल्याचे सांगितले. शहरात सातत्याने नवीन भूमिगत सुविधा उभारल्या जात आहेत. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्यजल वाहिन्या तसेच इतर विविध सेवा सुविधांचे जाळे विस्तारत असून भविष्यातही अशा कामांची गरज भासणार आहे.

अशा परिस्थितीत सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण केल्यास नंतर भूमिगत सुविधा टाकण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी पुन्हा रस्ते खोदावे लागतील, असे त्यांनी नमूद केले. शहरातील काही भागांमध्ये अद्याप मलनिस्सारण व्यवस्था आणि इतर भूमिगत सुविधांची कामे पूर्ण व्हायची आहेत. अशा ठिकाणी आधी काँक्रीटीकरण करणे आणि नंतर पुन्हा तेच रस्ते खोदणे हा सार्वजनिक पैशांचा अनावश्यक अपव्यय ठरेल. त्यामुळे प्रत्येक रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची आवश्यकता नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

रस्ते देखभाल धोरणावर भर

  • जड वाहतुकीचा ताण असलेल्या प्रमुख मार्गांवर काँक्रीटीकरण उपयुक्त ठरू शकते. मात्र अंतर्गत रस्त्यांबाबत वेगळा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील रस्त्यांचा पायाभूत स्तर मजबूत असल्यामुळे अनेक डांबरी रस्ते १३ ते १४ वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे ज्या ठिकाणी डांबरी रस्ते सक्षमपणे टिकू शकतात, तेथे अनावश्यक काँक्रीटीकरण करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.
  • रस्त्यांच्या कामांसाठी स्वतंत्र देखभाल धोरण तयार करण्यात येणार असून त्यात रस्त्यांची स्थिती, वाहतुकीचा ताण, भूमिगत सुविधांची गरज आणि भविष्यातील विकासकामांचा विचार केला जाणार आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण शक्य नाही किंवा जड वाहतुकीमुळे काँक्रीटीकरण आवश्यक आहे, तेथेच टीडब्ल्यूटीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – या निर्णयामुळे आगामी काळात शेकडो कोटी रुपयांच्या खर्चावर नियंत्रण येण्याची शक्यता असून महापालिकेच्या निधीचा वापर इतर आवश्यक नागरी सुविधांसाठी करता येणार आहे. सरसकट काँक्रीटीकरणाऐवजी गरजेनुसार रस्ते विकास आणि प्रभावी देखभाल यावर भर देण्याच्या दिशेने महापालिकेने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.