वाहन नोंदणीस विलंब; परवाना शुल्क दुप्पट; ‘वाहन’चाही बोजवारा

नवी मुंबई आरटीओ कार्यालयात सारथी ४ व वाहन ४ या अत्याधुनिक प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. मात्र सव्‍‌र्हर संथगतीने सुरू असल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागत आहे, त्यामुळे पूर्वीचीच यंत्रणा चांगली होती, असे वाहन खरेदी करणाऱ्यांचे आणि वाहतूकदारांचे मत आहे. केंद्र शासनाने शिकाऊ  परवाना नियमांत बदल केल्याने दर दुप्पट झाले आहेत. शिवाय परवाना मिळण्यास विलंबही होऊ  लागला आहे.

नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयात वाहनांची नोंद करणाऱ्यांची, वाहन परवाने घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कार्यालयात खेपा घालाव्या लागत असल्याने आणि पैसे भरण्यासाठी रांगेत ताटकळावे लागत असल्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली होती. कमी मनुष्यबळ, वाढलेला ताण यामुळे कर्मचारीही त्रासले होते. जमा झालेल्या रकमेचा भरणा करणे, पावत्या देणे यांसारखी अनेक कामे कर्मचाऱ्यांना करावी लागतात. ‘सारथी’मुळे सर्व कामे जलदगतीने होतील, तसेच कामाचा ताण कमी होईल, असा दावा करण्यात आला होता, मात्र हा दावा फोल ठरला आहे. नॅशनल इन्फोमॅटिक्स सेंटर या एजन्सीचे हे संकेतस्थळ अत्यंत संथ आहे. त्यामुळे वाहननोंदणी, वाहन हस्तांतरण नोंदणी इत्यादी कामांना विलंब होतो. ऑनलाईन कारभाराकरिता अखंडित इंटरनेट सेवेची आवश्यकता आहे, मात्र महानगर टेलिफोन निगमच्या इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे कामात अडथळे येत असल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्र सकारने शिकाऊ  परवाना नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल वाढत असला तरी परवाना मिळवू पाहणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वी ३६४ रुपयांत परवाना घरपोच मिळत असे, त्याची किंमत नव्या नियमानुसार ६१४ रुपये झाली आहे. यात ऑनलाईन कामे करून देणाऱ्यांची दुकानदारी जोरात सुरू झाली आहे. पूर्वी ते शिकाऊ  परवान्याची तारीख घेताना ५० ते १०० रुपये घेत असत आणि त्यांच्याकडून वेळेत परवाना मिळत असे. प्रक्रियेतील बदलानंतर त्यांनी २०० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

पूर्वी परवाना काढणारे जुजबी माहिती घेऊन शिकाऊ  परवान्याची तारीख देत. परंतु आता तीच तारीख देताना उमेदवाराचे सर्व पुरावे स्कॅन करून मगच तारीख मिळते. पुरावे स्कॅन केले नाहीत तर शिकाऊ  परवाना मिळत नाही. या प्रक्रियेत १५ ते २० मिनिटे वेळ जातो. कधी कधी इंटरनेट व्यवस्थित चालत नसल्याने यापेक्षा जास्त वेळ जातो. पूर्वी शिकाऊ  परवान्यासाठी रोज ८० उमेदवार असायचे आता ४० उमेदवारांनाही परवाना मिळत नाही, असे परिवहन निरीक्षकांनी सांगितले.

 

इंटरनेटचा वेग कमी आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. नवीन यंत्रणा सुरू केल्याने त्या यंत्रणेशी जुळवून घेताना थोडय़ाफार अडचणी येणे साहजिकच आहे. परंतु काही दिवसांत या समस्या सोडवल्या जातील.

संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी