नवी मुंबई: सानपाडा परिसरातील प्रस्तावित भूमिगत बोगद्याकरिता पूर्ण वाढ झालेल्या ४४० झाडांची तोड करण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजनेविरोधात आज रविवार, १ मार्च २०२६ रोजी सानपाडा येथील पाम बीच रोडवर शांत मानवी साखळी करण्यात आली.
नवी मुंबई शहरातील रहिवासी, पर्यावरणप्रेमी, आणि ज्येष्ठ नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात मुलांचाही सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध निषेध नोंदवण्यासाठी पाम बीच ग्रीन्स फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि सानपाडा ज्येष्ठ नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. रविवारी सकाळी सानपाडा येथील केसर सॉलिटेअर इमारतीसमोर आंदोलनाला सुरवात करण्यात आली होती .
नवी मुंबई महापालिकेच्या नोटिसांनुसार १११ झाडे तोडण्याचे आणि ३२९ झाडांची पुनर्लागवड करण्याचे प्रस्तावित आहे. याला पर्यावरण प्रेमी व नागरिकांचा तीव्र विरोध आहे. दशकांपूर्वीची झाडे ही मुख्य मार्गालगत महत्त्वाचा हरित संरक्षक पट्टा तयार करतात. परिपक्व झाडांच्या पुनर्लागवडीचे यश प्रमाण अनेकदा ४० टक्क्यांपेक्षा असते.पाम बीच ग्रीन्स फोरमचे संयोजक श्रीकांत पाटकी यांनी सांगितले की नवी मुंबई हे शहराच्या विकासाच्या विरोधात नाहीत. मात्र पायाभूत सुविधांचे नियोजन करताना ते जबाबदारीने झाले पाहिजे.
विद्यमान हरित आच्छादन नष्ट करण्यापूर्वी उड्डाणपूल किंवा एलिव्हेटेड रोड यांसारखे पर्याय नवी मुंबई महापालिकेने तपासले पाहिजेत.शहरातील पर्यावरण प्रेमींनी झाडांवर चिकटवलेल्या नोटिसांना उत्तर देताना नवी मुंबई महापालिकेकडे औपचारिक हरकतीही सादर केल्या आहेत. त्यामुळे रविवारी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर सानपाड्यातील ४४० झाडे वाचवण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करणार असल्याची माहिती पर्यावरण प्रेमींनी दिली आहे.
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले की नवी मुंबई शहरात प्रति व्यक्ती वृक्षसंख्या सुमारे एक आहे, तर शहरी मानक तीन झाडांचे आहे. ते शहरात तिपटीने वृक्ष संख्या वाढवण्याची आवश्यकता असताना दुसरीकडे ४४० झाडे तोडण्याचा पालिकेचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. दुर्दैवाने, वृक्षसंख्या वाढवण्याऐवजी महानगरपालिका ४४० परिपक्व झाडे तोडण्याचा विचार करत आहे.पाम बीच ग्रीन्सचे सतीश निकम यांनी सांगितले की आपण २१ व्या शतकातील शहर असे मिरवतो मग दुसरीकडे ४४० झाडे तोडून भुयारी मार्ग बनवताना ही झाडे वाचवण्यासाठी पर्याय शोधणे अत्यंत आवश्यक आहे .
सानपाडा येथील 440 झाडे तोडून भुयारी मार्ग बनवण्याच्या पालिकेच्या कृती विरोधात रविवारी मानवी साखळी करून झाडे वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता. ४४० झाडे वाचलीच पाहिजे यासाठी अखेरपर्यंत लढा देणार आहोत.
बी एन कुमार नॅटकनेक्ट फाउंडेशन,
