नाशिक – नाशिकच्या क्रीडा क्षेत्राचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जात असलेल्या यशवंत व्यायाम शाळा या संस्थेने ११० वर्षांमध्ये पदार्पण केले. यशवंत व्यायाम शाळेची स्थापना १९१७ साली झाली. या संस्थेच्या वतीने ११० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी यशवंत व्यायाम शाळेचे ज्येष्ठ सभासद, बलोपासक, प्रशिक्षक, खेळाडूंचे पालक, हितचिंतक आणि विविध क्रीडा संस्था, संघटना यांचे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. प्रवीण गेडाम यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यशवंत व्यायामशाळेत खेळाडूंना घडविण्याचे उत्तम काम तर केले जातेच, परंतु त्याचबरोबर खेळाडूंवर जे संस्कार केले जातात ते खेळाडूंना आयुष्यभर कामी येतात. आणि सक्षम नागरिक बनण्यासाठी हेच आवश्यक आहे. हे महत्वाचे काम यशवंत व्यायाम शाळेच्या माध्यमातून केले जात आहे. ही अभिमानाची आणि आजच्या युगात महत्वाची बाब आहे, असे डाॅ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनीही संस्थेच्या कार्याचा गौरव केला. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून संस्थेला आवश्यक सर्व बाबींचे सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
यावेळी मल्लखांब, ज्युदो आणि जिम्नॅस्टिक्स या खेळांची सुंदर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यशवंत व्यायाम शाळेच्या कार्यासाठी आणि उत्तोरोत्तर प्रगतीसाठी कायमच नाशिकच्या दानशूर नागरिकांकडून भरघोस अश्या वस्तुरूपी आणि रोख स्वरूपात देणग्या मिळत आहेत. केवळ यामुळेच संस्था क्रीडा क्षेत्रात चांगली वाटचाल करत आहे. या मान्यवरांचे ऋण म्हणून त्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये डॉ. प्रकाश जोशी, निशिकांत राजेबहाद्दर, डॉ. प्रतिभा धोपावकर, प्रदीप मोडक, उमेश राठी, अविनाश पाटील, प्रकाश देशमुख आदींचा समावेश आहे.
यावेळी जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक आबासाहेब घाडगे, डॉ. रत्नाकर पटवर्धन, ज्येष्ठ पत्रकार दीपक ओढेकर यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच यशवंत व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी विविध खेळांमध्ये राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी व्यायामशाळेच्या गेल्या ५०-६० वर्षाच्या विविध वाटचालीचा आढावा सादर केला.
पुढील काळामध्ये खेळाडूंना आणखी चांगल्या सुविधा देता येतील यासाठी संस्थेच्या वतीने आणखी काय करता येईल, याची माहिती देण्यात आली. आभार आनंद खरे यांनी मानले. सूत्रसंचालन सिमा पेठकर-कर्पे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ,संचालक डॉ. जयराम महाबळ, विजय खरोटे, डॉ. सदाशिव गोसावी, प्रशांत गायकवाड, प्रशिक्षक अविनाश खैरनार, संदीप शिंदे, विनायक दंडवते, योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, विजय पाटील, यशवंत जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.
