नवी मुंबई : राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी रेड कार्पेट अंथरले आहे. यातूनच लाडकी बहीण, भाऊ, शेतकऱ्यांपाठोपाठ आता लाडक्या उद्योजकांनाही सवलती देण्यात येत आहेत. यामुळेच सेमीकंडक्टर सारखे प्रकल्प राज्यात येत आहेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले. सेमीकंडक्टर प्रकल्पातील चीप समर्पितचा कार्यक्रम २०२६ मध्ये होईल, तेव्हा आमचेच सरकार सत्तेवर असेल, असा दावा करत त्या कार्यक्रमाचीही आताच अगाऊ नोंदणी करून ठेवण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नवी मुंबई येथे आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मराठी माणूस युनिक, अद्ययावत आणि वेगळ्या क्षेत्रात क्रांती घडविण्याचे काम करतोय. यामुळेच राज्य सरकार आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या पाठीशी आहे. बांधकाम प्रकल्प राज्यासाठी गेमचेंजर ठरत आहेत. त्याचप्रमाणे सेमीकंडक्टर प्रकल्प देशासाठी महत्वाचा ठरणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आधीच्या सरकारकडून उद्योगांना मदत मिळत नव्हती. यामुळेच उद्योग राज्यातून निघून गेले. परंतु आमचे सरकार आले आणि आम्ही उद्योग वाढीसाठी अनेक करार केले. तसेच त्यांना सवलती दिल्याने राज्य औद्योगिक मित्र बनले आहे, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणली. आता तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी पाच ट्रीलियन डाॅलर करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यातील एक ट्रीलियन डाॅलरचे उद्दिष्ट राज्याने आखले असून सेमीकंडक्टर प्रकल्प सारख्या उद्योगांमुळे ते पूर्ण होऊ शकेल. सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटी आणि त्यानंतर २४ हजार कोटी अशी एकूण ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – गणेश मंडळांना अभय; फलक तयार करणाऱ्यांवर कारवाई

सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला गती मिळणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतीय संकल्पनांना बळ देण्यासाठी हा सेमीकंडक्टर प्रकल्प एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे. या प्रकल्पामुळे डिजिटल क्रांतीला गती मिळणार आहे. उद्योग क्षेत्राला नेहमीच गती देण्याचे धोरण आम्ही स्वीकारले आहे. उद्योगाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रीलियन डॉलरच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या माध्यमातून चार हजारापेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

भारत आयटी आणि डिझाईन क्षेत्रात खूप पुढे गेले आहे. परंतु हार्डवेअर क्षेत्रात मागे होते. ही बाब कोविड काळात भारतासह इतर देशांच्या लक्षात आली. चीन, जपान यांच्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांना इलेक्ट्रॉनिक्स चिप्स आणि इतर गोष्टी मिळत नव्हत्या. त्यामुळे भारताला जगामध्ये विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचे असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग व्हायचे असेल तर सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावेच लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सेमीकंडक्टर प्रकल्पातील चीप समर्पितचा कार्यक्रम २०२६ मध्ये होणार आहे. तेव्हा आमच्याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सत्तेत असणार आहोत, यात आमच्या मनात शंका नाही. परंतु तुमच्या मनात शंका असो किंवा नसो. तेव्हाच्या कार्यक्रमाची आगाऊ नोंदणी आताच करून ठेवा, असे फडणवीस यांनी सांगितले. तीच रि ओढत २०२६ मध्ये चीप समर्पितच्या कार्यक्रमावेळी आमचेच सरकार सत्तेवर असेल, असा दावा करत त्या कार्यक्रमाचीही आताच अगाऊ नोंदणी करून ठेवण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

हेही वाचा – नवी मुंबई : आपत्कालीन स्थितीत १४ गावांत महापालिकेचीच धाव!

लाडक्या बहिणींना आम्ही शब्द दिला होता. त्याप्रमाणे रक्षाबंधनला त्याच्या खात्यात पैसे जमा केले. लाडक्या बहिणींना एकूण १ कोटी ६९ लाख रुपये देण्यात आले. त्या मागेही सेमीकंडक्टर सारखा प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.