नवी मुंबई: नवी मुंबईतील दबंग म्हणून ओळखल्या जाणार्या नवनिर्वाचित नगरसेवकाच्या अंगावर एका महिलेने चप्पल फेकून मारली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अतिक्रमण विभागाने तिच्या झोपडीवर कारवाई केली होती. याला जबाबदार तो नगरसेवक असल्याच्या समाजातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.

नवी मुंबईतील दिघा हा भाग महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राच्या कक्षेत येतो. या ठिकाणी यादव नगर म्हणून भाग असून येथे बहुतांश उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातून आलेल्या लोकांची वस्ती आहे. याच भागातून राम आशिष यादव यांनी नगरसेवक म्हणून दोन वेळा एक वेळा त्यांची मुलगी नगरसेवक म्हणून निवडणून आली होती.

तर नुकत्याच पार पडलेल्या महानगर पालिका निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. वादग्रस्त नगरसेवक म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. भाजप आमदार वन मंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणाऱ्या यादव यांनी काही वर्षांपूर्वी भाजपला सोडचिट्ठी देत धनुष्यबाण हाती घेतले आहे.

दिघा भागात झोपडपट्टी पुनर्वसन वारे वाहात असून अशा वेळी काही महिन्यापूर्वी झालेल्या कारवाईत काही अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. या भागात फेरफटका मारण्यासाठी म्हणून आठ ते दहा दिवसांच्या पूर्वी राम आशिष यादव आपल्या समर्थकांच्या सह गेले होते. त्यावेळी एका दुकानाच्या समोर एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली.

ती चप्पल त्यांना लागली व ते त्या महिलेच्या दिशेने गेले. असा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आणि पुन्हा यादव प्रकाशझोतात आले. या प्रकरणी राम आशिष यादव यांना विचारणा केली असता काही लोक पैसे घेऊन झोपडे बनवून विकतात, आणि एमआयडीसी त्यावर कारवाई करते. अशा प्रकारातून हि कारवाई केली गेली. त्यात राजकीय हेतून त्या महिलेस प्रेरित करून चप्पल फेकण्याचा प्रकार घडला.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे. असे यादव यांनी स्पष्ट केले. याबाबत शिवसेना नेते व विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना विचारणा केली असता घडला प्रकार जुना आहे. ज्या महिलेने चप्पल फेकली तिची झोपडी अनधिकृत ठरवत अतिक्रमण विभागाने कारवाई करीत पाडली. त्यामुळे चिडून तिने यादव यांच्या चप्पल फेकून मारली.

त्या महिलेची समजून काढण्यात आली . हा प्रकार गैरसमजातून झाला असून आमच्या दृष्टीने प्रकरण संपलेले आहे. असे चौगुले यांनी सांगितले.
तसेच रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी दिलेल्या माहिती नुसार हा प्रकार आठ ते दहा दिवसांच्या पूर्वीचा आहे. त्यावेळी राम आशिष यादव यांनी तक्रार अर्ज दिला होता. आम्ही अदखल पात्र गुन्हा म्हणून नोंद केली होती.