नवी मुंबई : स्वच्छतेत देश-राज्यात आघाडीवर असलेल्या नवी मुंबई शहराने ‘सुगंधी शहर’ संकल्पनेकडे वाटचाल सुरू करत ‘सुगंधी अंगण’ अभियानाचा वाशीगाव येथे बुधवारी शुभारंभ केला.

महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते आणि उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. ‘सुंदर माझे अंगण, सुगंधी माझे शहर’ हे घोषवाक्य जाहीर करत अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरणही यावेळी करण्यात आले. वाशीगावच्या पारंपरिक गावदेवी जत्रोत्सवाच्या औचित्याने या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.

जत्रोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक भान यांची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी स्थानिक युवक-युवतींनी पारंपरिक कोळी वेशभूषेत सादरीकरण करून कार्यक्रमाला रंगत आणली. महापौर सुजाता पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत करत शहरभर ही मोहीम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये शहराने मिळवलेली आघाडी कायम राखण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवत फुलझाडांची लागवड करून तो सुगंधित करण्याचा पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नवी मुंबईचा समावेश ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये झाल्याने या उपक्रमामुळे त्या दर्जाला अधिक बळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

उपमहापौर दशरथ भगत यांनी ‘सुगंधी शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. सार्वजनिक तसेच दुर्लक्षित जागांची स्वच्छता आणि सुशोभीकरणावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभागृह नेते सागर नाईक यांनी हा उपक्रम स्वच्छता अभियानाला नवे परिमाण देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. स्वच्छता ही केवळ क्रमवारीसाठी नसून नागरिकांच्या समाधानासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून हे अभियान शहरभर राबविले जाईल, असे ते म्हणाले.

परिसर दत्तक घेऊन संगोपनाचे आवाहन

या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरासमोरील अंगण आणि इमारतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच सार्वजनिक जागा, फुटपाथ, चौक, वाचनालय, बसथांबे ‘दत्तक’ घेऊन तेथे सुगंधी फुलझाडांची लागवड व संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना अभियानात सहभागी होण्याची शपथ देण्यात आली.

ब्लर्ब – नागरिकांनी घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवत फुलझाडांची लागवड करून तो सुगंधित करण्याचा पुढाकार घ्यावा, असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी केले आहे.