वडिलोपार्जित जमिनीच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादातून तळोजा नोडमधील घोटगाव येथे लहान भावाचा खून केल्याप्रकरणी ५५ ​​वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीवर लाकडी दांडके आणि विळ्याने हल्ला केला होता. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. चुलत्याच्या डोक्यावर व मानेवर विळ्याने वारंवार वार करणार्‍या आरोपीच्या मोठ्या मुलाला पोलिसांनी अटक केली असून आरोपी पिता-पुत्र दोघे फरार आहेत.

तळोजा येथील घोटगाव येथील बलराम पाटील आणि त्यांची दोन मुले मनोज पाटील (२५) आणि नितीन पाटील (२२) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी बलराम यांचा भाऊ निवृत्ती पाटील (५२) यांची हत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मनोजला अटक करण्यात आली आहे, तर बलराम आणि नितीन फरार आहेत.

निवृत्ती पाटील (५२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची विवाहित बहीण सुनंदा कोळेकर (३८) हिलाही आरोपी बलराम पाटील याने भांडणानंतर मारहाण केली होती आणि ती या गुन्ह्याची साक्षीदार आहे. तिने तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२३,३२४, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीने या गुन्ह्याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानी सांगितले की ते आणि त्यांचा मृत भाऊ निवृत्ती त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत नवीन बोअरवेलसाठी भूमिगत पाइपलाइन टाकत होते. जमिनीवर पाइपलाइन टाकण्यास बलराम व त्यांच्या मुलांनी आक्षेप घेतला. यावरून शाब्दिक वादाची ठिणगी पडली.

त्यानंतर लगेचच तिन्ही आरोपींनी बहिणीला आणि निवृत्ती यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. बलराम यांचा मोठा मुलगा मनोज याने निवृत्तीवर विळ्याने हल्ला केला. निवृत्ती यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या सुनंदावर पनवेल येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर तिने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.