scorecardresearch

‘एनएमएमटी’च्या सक्षमीकरणावर भर

परिवहन उपक्रमास होणारा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढवून इंधन खर्चात कपात करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाबरोबर बुधवारी नवी मुंबई परिवहन उपक्रमाचाही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिकेने या वर्षी ‘एनएमएमटी’ला अनुदानापोटी १८१ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र महापालिकेच्या अनुदानातूनही परिवहन उपक्रमाचा तोटा भरून निघत नाही. त्यामुळे आता वाहतूक उत्पन्नाखेरीज बाह्य उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. आगामी कालावधीत परिवहन उपक्रमाने विद्युत बसेस आणि बस स्थानकांचा वाणिज्यिक वापरातून उत्पन्नवाढीवर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

आरंभीच्या शिलकीसह एकूण महसुली व भांडवली जमा रु. ३७२ कोटी ४७ लाख ७९ हजारमधून महसुली व भांडवली खर्च रु. ३७२ कोटी ३७ लाख ९७ हजार वजा जाता ९ लाख ८३ हजार रुपये शिलकीचे जमा-खर्चाचे अंदाज सादर करण्यात आले आहेत.

परिवहन उपक्रमास होणारा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढवून इंधन खर्चात कपात करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. वाहतूकबाह्य उत्पन्नात वाढ करण्यासाठी बस आगार व बस स्थानकांचा वाणिज्यिक तत्त्वावर विकास करण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने वाशी सेक्टर ९, वाशी येथील भूखंडाच्या वाणिज्यिक विकासाचे काम सुरू झाले आहे.

सेक्टर १२, वाशी येथील भूखंडावर बसस्थानकासाठी १२ बसथांबे

त्याचप्रमाणे वाशी सेक्टर १२ येथील भूखंडावर बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत आंतरक्रीडा संकुलाच्या तळमजल्यावर बसस्थानकासाठी १२ बस थांबे व ३ बससाठी बसस्थानके असणार आहेत. तळमजला व पहिल्या मजल्यावर सामायिक १२ दुकाने प्रस्तावित करण्यात आली आहेत.  या दोन्ही प्रकल्पांमधून परिवहन उपक्रमाला प्रतिवर्षी ७५ कोटी इतके उत्पन्न प्राप्त होणार आहे.

कोपरखैरणे व बेलापूर येथील भूखंडांचा वाणिज्यिक विकास

याच धर्तीवर कोपरखैरणे व बेलापूर येथील भूखंडांचा वाणिज्यिक विकास  करून  प्रतिवर्षी ५० कोटी इतके उत्पन्नाचे नियोजन करण्यात येणार आहे. याद्वारे परिवहन उपक्रम स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. इको-मोबिलिटीवर भर देत सद्य:स्थितीत परिवहन उपक्रमात १८० विद्युत बस असून ८६ विद्युत बस खरेदी करण्यात येत आहे. आगामी तीन वर्षांत इको फ्लिटचे नियोजन करण्यात आले आहे. परिवहन उपक्रमास प्राप्त होणारे उत्पन्न व त्यातून करावा लागणारा अत्यावशक खर्च याचा ताळमेळ ठेवून नवी मुंबईतील प्रवाशांच्या गरजेनुसार अधिक चांगली सेवा देण्याकरिता पर्यावरणपूरक आणि प्रदुषणरहित विद्युत बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्टय़े

नवी मुंबई शहरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांसाठी डबलडेकर बसची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

पर्यावरणपूरक ५० विद्युत बसेस जीसीसीवरती तसेच राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत २५ विद्युत बसेस खरेदीचे नियोजन आहे.

वाशी सेक्टर-९ बसस्थानकाचा वाणिज्य विकासाच्या कामास पूर्णत्वास नेणे. याशिवाय वाशो सेक्टर १२ कोपरखैरणे इत्यादी स्थानकांचाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वाणिज्य विकास करण्यात येणार आहे.

पर्यावरणपूरक बससेवा देण्यासाठी डिझेलच्या बसेस विद्युत आणि सीएनजीमध्ये बदल करण्याचे नियोजित आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai transport undertaking wednesday budget navi mumbai municipal corporation budget presented akp

ताज्या बातम्या