नवी मुंबई : शहरातील विविध भागांत गढूळ पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी सुरू असताना नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन संबंधित ठिकाणी पाणी नमुने तपासण्यासाठी पथके पाठविण्यात येणार असून, सोमवारी (१ जून) शहरातील विविध भागांना भेट देऊन स्वतः परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत गढूळ, मातीमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौरांनी शनिवारी मोरबे धरण प्रकल्प, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, आग्रोळी येथील जलकुंभ, पंपिंग स्टेशन तसेच स्काडा प्रणालीची पाहणी केली. यावेळी पाणी शुद्धीकरण आणि वितरण प्रक्रियेची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, अलीकडे मुख्य जलवाहिनी आणि इतर जलवाहिन्यांवर दोन दिवसांचा शटडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर काही भागांत गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या अनुषंगाने विविध भागांतून ६५० हून अधिक पाण्याचे नमुने संकलित करून त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पाणी पिण्यास योग्य असल्याचे निष्कर्ष समोर आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

शटडाऊननंतर रिकाम्या झालेल्या जलवाहिन्यांमध्ये तळाशी साचलेला बारीक गाळ आणि मातीचे कण पाण्याच्या प्रवाहात मिसळल्याने सुरुवातीच्या काळात काही भागांत गढूळ पाणी आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अनेक गृहनिर्माण संकुलांतील पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यामुळे त्यामधील साचलेला गाळ पाण्यात मिसळल्याचाही परिणाम काही ठिकाणी दिसून आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तक्रार निवारण्यासाठी टोल फ्री क्रमांक

तक्रारींचे निवारण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी १८००२२२३०९ टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला असून नागरिकांनी पाण्याबाबतच्या तक्रारी थेट या क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन पाण्याचे नमुने घेतील, त्यांची गुणवत्ता तपासतील आणि त्याबाबतची माहिती नागरिकांना देतील, असे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, सोमवारी महापौर सुजाता पाटील, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विविध भागांना भेट देऊन पाणी नमुन्यांची तपासणी, तक्रार निवारणाची प्रक्रिया आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत. शहरातील काही भागांतून तक्रारी सुरूच असल्याने या पाहणीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.