नवी मुंबई : नवी मुंबईत रविवारी काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. वाशीतील जुहूगाव येथे जुन्या इमारतीचा भाग कोसळून रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर घणसोलीजवळील मॅकडोनाल्ड्सच्या आउटलेटमध्ये काम करत असलेल्या विजेचा धक्का लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे शहरातील जीर्ण इमारतींची सुरक्षितता आणि व्यावसायिक आस्थापनांमधील सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वाशी सेक्टर ११ येथील जुहूगाव परिसरातील शिवसेना शाखेजवळील अपना ढाबा परिसरात रस्त्यालगत असलेल्या गीता आर्केड या चार मजली जुन्या इमारतीचा काही भाग रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक कोसळला. त्यावेळी रस्त्यावरून पायी जात असलेल्या राजेश शेट्टी (३५) यांच्या डोक्यात कोसळलेल्या भागातील लोखंडी सळई घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर वाशी येथील महापालिका रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. परिसर सुरक्षित करून मदत व बचावकार्य करण्यात आले. इमारतीचा भाग नेमका कशामुळे कोसळला, तसेच इमारतीच्या संरचनात्मक स्थितीबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोलीजवळील मॅकडोनाल्ड्सच्या आउटलेटमध्ये ड्युटीदरम्यान प्लास्टिकचा कचरा टाकत असताना बुद्धीराम प्रधान या २२ वर्षीय तरुणाला अचानक विजेचा धक्का बसला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी येथील महापालिका रुग्णालयात पाठविण्यात आला असून, विजेचा धक्का नेमका कशामुळे बसला, विद्युत यंत्रणेत काही बिघाड होता का किंवा सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
एकाच दिवशी घडलेल्या या दोन्ही दुर्घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सार्वजनिक ठिकाणे, जीर्ण इमारती आणि व्यावसायिक आस्थापनांमधील सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
