नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने वाशीत दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख २० हजार रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सलाम इस्लाम खान, (४५ रा. कोनगाव, कल्याण, जि. ठाणे) आणि मोहसीन अस्लम खान, (३७, रा. उलवे, ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाशी सेक्टर १७ येथील चौकातून पाम बीचकडे जाणाऱ्या मार्गावर दोन जण येणार असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास सहाय्यक पोलीस आयुक्त अजय लांडगे यांच्या मार्गदर्शखाली अंमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला होता. यावेळी खबरीने दिलेल्या वर्णनानुसार दोन संशयित दिसताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता २४ लाख २० हजार रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) हा अंमलीपदार्थ मिळून आला. त्यांना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा - दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या जागा मालकाला अटक, विकासक अद्याप फरार; शोध सुरूच हेही वाचा - पनवेल : अवघ्या २०० रुपयांच्या वादावरुन हत्या, काही तासांत हत्या करणारा अटकेत या गुन्ह्यातील अंमली पदार्थ कोठून आणला याबाबत अंमली पदार्थविरोधी कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडू अधिक तपास करीत आहेत.