नवी मुंबई : रविवारी बँकेच्या कामकाजासाठी बाहेर पडलेल्या युनियन बँकेतील महिला अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नेरूळ येथे घडली. नेहा राजीवकुमार गुप्ता (३६) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. पामबीच रोडवरील सारसोळे सिग्नलजवळ त्यांच्या रिक्षाला टॅक्सीने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या गुप्ता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी टॅक्सीचालक मोवीन आसिफ शेख (३५) याला अटक केली आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या २८ ते ३० सप्टेंबरदरम्यानच्या प्रस्तावित देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होऊ नये म्हणून २७ सप्टेंबरला रविवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, रविवारी रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सोमवारपासून सुरू होणारा तीन दिवसांचा प्रस्तावित संप स्थगित करण्यात आला.
याच दिवशी नेहा गुप्ता यांना मात्र काळाने गाठले. त्या युनियन बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास पामबीच रोडवरील सारसोळे सिग्नलजवळ त्या रिक्षातून प्रवास करीत असताना अपघात झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोवीन शेख हा टॅक्सी चालवत होता. त्याने वाहन हयगयीने व अविचाराने भरधाव वेगाने चालवून रिक्षाला धडक दिली. या धडकेत गुप्ता गंभीर जखमी झाल्या. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, रविवारी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत गुप्ता यांनी कौटुंबिक अडचण असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना कळविले होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. घरी मुलाची देखभाल करण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्याने कार्यालयात येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा सहकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर त्या रविवारी कामासाठी आल्या होत्या.
गुप्ता यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ज्या रविवारी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते, त्याच दिवशी हा अपघात झाला. दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारा प्रस्तावित संपही रविवारी रात्री स्थगित झाला. त्यामुळे बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या या रविवारचा शेवट मात्र एका महिला अधिकाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने झाला.
नेरूळ पोलिसांनी टॅक्सीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
