नवी मुंबई : अंमली पदार्थांच्या बेकायदा व्यापाराविरोधात नवी मुंबई गुन्हे शाखेने वाशी परिसरात केलेल्या धडक कारवाईत मोठा साठा उघडकीस आला असून तब्बल १ कोटी २६ लाख २५ हजार रुपये किंमतीचा कोकेन जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तीन नायजेरीयन नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात “नशा मुक्त भारत २०२८” या अभियानाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडून शहरातील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली.
वाशीतील जुहुगाव परिसरात काही नायजेरीयन नागरिक अंमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी चार ठिकाणी एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईदरम्यान वाशी सेक्टर-११ मधील हरियाली निवास येथील एका फ्लॅटमध्ये झडती घेण्यात आली.
झडतीत २५२.५ ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा, किंमत सुमारे १ कोटी २६ लाख २५ हजार रुपये, तसेच १२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या प्रकरणात ऑलिव्हर ओकेचुक्वू उगवु या नायजेरीयन नागरिकासह मादुयाबुकी कॉसमॉस इज्वेओमा आणि इनोसंट डाडा लाविआन्स या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे तिघेही वाशी परिसरात वास्तव्यास असून अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीतील महत्त्वाचे दुवे असल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्राथमिक तपासात या साठ्याचा संबंध आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाशी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील पुरवठा साखळी, संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास केला जात आहे. अटक आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने विविध पथकांच्या समन्वयातून पार पाडली असून शहरातील अंमली पदार्थ नेटवर्कवर आणखी कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
